छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बँकांचे वागणे योग्य नाही असे कळले आहे. कोणत्याही बँकेने शेतकऱ्याकडे तगादा लावू नये, तसेच सावकाराने शेतकऱ्यांना त्रास देऊ नये अन्यथा सरकार सोडणार नाही, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील गावांची पाहणी करण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. अचूक पंचनामे व्हावेत अशा मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या आहेत. पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचे नियोजन करावे लागणार असून जलसाठे मजबूत करण्यावर सरकारचा भर असेल, असे बावनकुळे म्हणाले. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे निकष पूर्ण करण्यासाठी पंचनामे आवश्यक आहेत. यामुळेच मदत मिळेल, असेही बावनकुळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. पंचनामे न करणे हे नुकसानदायक आहे, असेही ते म्हणाले.

पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी प्रकरणाच्या अनुषंगाने बोलताना बावनकुळे म्हणाले, ‘महसूल आणि पोलीस विभागाने रिपोर्ट मांडला आहे. महसुली कायद्याप्रमाणे जो जमीन घेतो आणि विकतो तो गुन्हेगार आहे असे महसुली कायदा म्हणतो. त्यामुळे घेणारा, विकणारा आणि अधिकारी अशा तिघांवर कारवाई केली आहे.’

काँग्रेसचे निवेदन

दुष्काळी स्थितीची माहिती घेऊन काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्र्यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एक लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, सोयाबीन पिकांसाठी ५८ लाख तर कापसासाठी ५२ लाख रुपयांचा पीक विमा मंजूर करावा तसेच शेतमजुरांना २५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर करावे अशी मागणी काँग्रेसने केली. यावेळी काँग्रेसचे जगन्नाथ काळे, सय्यद आक्रम, संदीप बोरसे, अनिल लोखंडे यांची उपस्थिती होती.