संरक्षण मंत्रालयाचा बनावट लोगो, तसेच भारतीय राजमुद्रेचा वापर करून २ कोटी १७ लाख रुपये उकळल्याचा प्रकार येथे उघडकीस आला. या प्रकरणी सात आरोपींविरुद्ध स्थानिक गुन्हा शाखेने गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी हम्मु चाऊस यास अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली.
नासा या अंतराळ संशोधन संस्थेसाठी आम्ही प्रकल्प केला असून या प्रकल्पाच्या विक्रीसाठी मध्यस्थी म्हणून एखाद्या कंपनीची मदत घ्यावी लागते. या सर्व व्यवहारात २-३ कोटी रुपये खर्चावे लागतात. आमच्याजवळ सुपर आर. पी. ४२ इंच राईस पुलिंग असून त्याचा सध्या बाजारभाव ५ कोटी रुपये इंच एवढा आहे. तुम्ही ही वस्तू पुन्हा १० ते १५ हजार कोटी रुपयांपर्यंत विकू शकता, अशी बतावणी या ७ आरोपींनी केली. तुम्ही आम्हाला फक्त ७ हजार कोटी रुपये द्या. बाकी तुम्ही कितीलाही वस्तू विका असेही या महाभागांनी येथील शेख अब्दुल शेख फरीद यांना सांगितले. या बतावणीला भाळून शेख अब्दुल यांनी २ कोटी १७ लाख रुपये देऊन टाकले. मात्र, आरोपींकडे कोणतीही वस्तू नव्हती, असे उघडकीस झाले.
अल जिलानी हमीद अहेमद अब्दुल्ला (हम्मु चाऊस), सय्यद नबाब सय्यद अजन (कादराबाद प्लॉट), सय्यद काशीफ (कादराबाद प्लॉट), मो. हकीम (कर्नाटक), युसूफ मेहंदीकर (इटको कंपनीचा कर्मचारी, मुंबई), अप्पाराव (हैदराबाद), जावेद अन्सारी (कादराबाद प्लॉट) या आरोपींनी शेख अब्दुल शेख फरीद यास गंडा घातला. खोटय़ा राईस पुलिंगचा आधार घेऊन वरील आरोपींनी २ कोटी १७ लाख रुपये घेतले. पशाची मागणी वारंवार करूनही आजपर्यंत पसे परत दिले नाही म्हणून वरील आरोपींविरुद्ध सोमवारी गुन्हा नोंदविण्यात आला.