छत्रपती संभाजीनगर – शेतीतील कामासाठी महिलांना घेऊन निघालेल्या रिक्षाला एका खासगी बसने दिलेल्या धडकेत एक महिला ठार तर पाच जण अन्य जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर-जालना मार्गावरील सटाणा फाट्याजवळ घडला. विमल गायकवाड (वय ६५, रा. करमाड), असे मृत महिलेचे नाव आहे.

रिक्षाचालक गुलाब नूर शेख (रा. जडगाव) हा नागुणीचीवाडी येथे महिलांना रिक्षातून शेतीकामासाठी घेऊन जात होता. सुमित्रा अशोक गायकवाड, वंदना मुकेश बर्डे, सुनीता बाळू पवार, छाया राजू पवार (रा. सर्व करमाड) व चालक गुलाब नुर शेख या जखमींना करमाड पोलिसांनी स्वामी नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकाद्वारे दाखल केले. याप्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.