परभणी : जिंतूर तालुक्यातील बोरी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवल्यामुळे ४६ जणांवर पोलिसांनी कारवाई केल्याची घटना काल शुक्रवारी (दि.२०) घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे बोरी व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान पोलिसांच्या या कारवाईच्या निषेधार्थ बोरी येथे आज शनिवारी (दि.२१) पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून कडकडीत बंद पाळण्यात आला.
जिंतूर तालुक्यातील बोरी येथे गेल्या काही महिन्यापासून तरुणांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी ग्रामपंचायतची कागदपत्रे घेऊन जागा अधिकृत केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा या ठिकाणी बसवण्यासाठी तरुणांनी प्रयत्न केले. यानंतर दिनांक २० फेब्रुवारी रोजी तरुणांनी व काही नागरिकांनी पुढाकार घेऊन संभाजी महाराज यांचा पुतळा या ठिकाणी बसवला. ही घटना कळताच बोरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक थोरवे, गायकवाड व इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रसंगी तरुण व पोलिसांमध्ये शाब्दिक खडाजंगी उडाली. यादरम्यान हे पुतळा बसवण्याचे काम बेकायदेशीर असल्याचे पोलीस सांगत होते तर सदर काम गेल्या अनेक महिन्यापासून करत असून आमच्याकडे कागदपत्रे असल्याचे तरुण व नागरिक सांगत होते.
पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी घटनास्थळी भेट दिली. जिंतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल व स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला. या प्रकरणी बोरीच्या पोलीस ठाण्यात ४६ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बाजारपेठ कडकडीत बंद, गुन्हे मागे घेण्याची मागणी
दरम्यान पोलिसांच्या या कारवाईचा निषेध म्हणून बोरी व परिसरातील नागरिकांनी शनिवारी (दि.२१) बोरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात पोलीस बीट जमादार दिलावर खान पठाण यांना निलंबित करणे व चुकीचा एफआयआर रद्द करणे या मागण्या करण्यात आल्या. या मागण्या मान्य न केल्यास मंगळवारी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनात बोरी व परिसरातील विविध गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. जिंतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या कार्यवाहीचा निषेध म्हणून बोरी येथे शनिवारी दिवसभर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने, प्रतिष्ठाणे बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.

