छत्रपती संभाजीनगर : इराण आणि इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक वायू पुरवठ्यावर होणारा परिणाम होईल असे गृहीत धरुन विद्युत शेगडीच्या मागणीत गेल्या दोन दिवसात मोठी वाढ झाली आहे. दररोज एखाद्या दुकानातून होणारी सहा ते आठ शेगड्यांची विक्री होत असे ती आता जवळपास १५ ते २० पर्यंत झाला आहे. ठोक बाजारात ५० टक्के मागणी वाढली आहे. या क्षेत्रात ‘ इन्फ्रा रे ’ विद्युत शेगडीची सध्या चलती आहे. या शेगडीवर कोणतेही भांडे बसते असे विक्रेते सांगतात.

काही शहरातील हॉटेल व्यावसाय बंद पडू लागले आहेत. तशी माहिती जसजशी पसरू लागली तसतसे घरगुती गॅसचा तुटवडा जाणवेल असे गृहीत धरुन विद्युत शेगडीची मागणी केली जात आहे. शहरातील सोनी एजन्सीचे राजकुमार सोनी म्हणाले, या क्षेत्रात प्रेस्टीज, बजाज, बॉस, यांची मोठी बाजारपेठ आहे. पूर्वी महिनाभरात ४० – ५० विद्युत शेगड्या विकल्या जात आता ते १५०पर्यंत वाढले आहेत. ज्या विद्युत शेगडीवर सर्व प्रकारची भांडी बसतात अशा शेगडीची मागणी वाढली आहे.

व्यावसायिक पातळीवर विद्युत शेगडीमध्येही मोठी मागणी आहे. विशेषत: इलेक्टीक तवा, भट्ट्या यातही मोठी मागणी नोंदली जात असल्याचे व्यावसायिक गिरीश बोरा यांनी सांगितले. या विद्युत शेगडीच क्षमता जेवढी अधिक तेवढी त्याची किंमत असते. दरम्यान घरगुती गॅसची सध्या कोणतीही अडचण नसली तरी पुढील काळात गॅस पुरवठ्यात अडचणी येऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांच्याकडे घरगुती गॅस उपलब्धतेबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, ‘ गॅस पुरवठा करणाऱ्या तीन कंपन्यांकडे सध्या दोन दिवसाचा साठा आहे. दररोज २० हजार १३० गॅस टाक्यांचा पुरवठा केला जातो. गॅस उपलब्ध होण्यासाठी पाच ते सहा दिवस लागतात. नाशिक डेपोतून १४० ते १५० टन गॅस उपलब्ध होत आहे. जिल्ह्यात ७४ गॅस एजन्सी आहेत. दोन सिलिंडरमधील खंड पूर्वी १५ दिवस होता आता तो २५ दिवस करण्यात आला आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून विद्युत शेगडीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.