छत्रपती संभाजीनगर – अन्न व आैषध प्रशासनाने भेसळीविरोधात सुरू केलेल्या कारवाईच्या सत्राचा परिणाम शहरात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये बंद दुधावर झाला असून, दररोजची सुमारे २५ हजार लिटर आवक आटली आहे. शहरात अंदाजे अडीच ते तीन लाख लिटर दूध द्रव (खुले) व प्लास्टिक पिशवीबंद दूध येते. त्यात अलिकडच्या काळात सुमारे ३० ते ३५ हजार लिटर दुधाची तूट निर्माण झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा सहकारी दूध संघाच्या विपणन विभागानेही प्लास्टिक बंद पिशव्यांमधून येणाऱ्या दूधावर परिणाम झाल्याच्या माहितीस दुजोरा दिला आहे.

शहरात काही नामांकित कंपन्यांसह जालना, अहिल्यानगर आदी भागातून प्लास्टिक पिशव्यांमध्ये बंद दूध विक्रीसाठी येते. काही नामांकित कंपन्यांचे दूध आणि डझनभर आसपासच्या जिल्ह्यातील स्थानिक कंपन्यांकडून दुधाचा पुरवठा शहराला होतो. शहरातील सुमारे एक हजारच्या संख्येने असलेल्या दूध डेअरी दुकानांवर ही आवक होते. यामध्ये डझनभर नामवंत डेअरी असून, त्यांच्या प्रत्येकी एका दुकानावरून दररोज ५ हजार लिटर दुधाची, तर अन्य काही लहान-मध्यम डेअरींवरून १ ते ३ हजार लिटर दुधाची विक्री होत असल्याचे सांगितले जात आहे.

प्लास्टिक पिशवीबंद दुधाची यापूर्वी दररोज दीड लाख लिटरने आवक होत होती. आता एक सव्वा लाख लिटरच दूधच शहरात येत असून, शेतकरी किंवा पशुपालनातून दुधाचा व्यवसाय करणाऱ्यांकडून संकलित करून आणून विकणारे दूधही दीड लाख लिटरपर्यंत असल्याची माहिती जिल्हा दूध संघातील सूत्रांकडून मिळाली.

कमी दरात विकणाऱ्या कंपन्या गायब

कमी दरात परंतु नामांकित कंपन्या असलेल्यांकडून होणाऱ्या आवकवर सध्या परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या कंपन्यांकडून स्पर्धेतून दुधाची विक्री कमी दराने करण्यात येत होती. त्यांना शेतकरी किंवा दुधाचा पारंपरिक व्यवसाय असलेल्यांच्या दरापेक्षा कमी दर ठेवून विक्री करणे कसे परवडत होते, असा प्रश्न सध्याच्या परिस्थितीतून उपस्थित होत आहे. आता त्या कंपन्यांच्या दुधाची आवक घटली आहे.

जिल्हा सहकारी दूध संघाकडे दररोज ६० ते ६५ हजार लिटर दूध संकलित होते. संघाकडून प्लास्टिकबंद पिशव्यांमधून ३२ ते ३५ हजार लिटर दुधाची विक्री होते. शहरात साधारणपणे दीड लाख लिटर दूध प्लास्टिक बंद पिशव्यांमधून यायचे. असे दूध पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून होणारी आवक घटल्याचे बाजारपेठेतील चित्र आहे. पवन डांगी, विपणन अधिकारी.

मिठाईची आवकही घटली

शहरातील काही स्थलांतरित व्यावसायिकांच्या मिठाई दुकानातील पदार्थ निर्मितीवर परिणाम झाल्याचेही चित्र आहे. या व्यावसायिक समुहाला जिल्ह्याबाहेरील त्यांच्या यंत्रणेकडून मिठाईचा पुरवठा होतो. मात्र, राज्यभरातच सुरू असलेल्या कारवाईचा धसका घेऊन मिठाई दुकानांना होणाऱ्या मिष्ठान्नाचा पुरवठा घटला असल्याचे पारंपरिक तथा स्थानिक व्यावसायिक असलेल्या दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे.