छत्रपती संभाजीनगर: वाळुज औद्योगिक वसाहतीमध्ये पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पाणीटंचाईच्या विरोधात सोलापूर- धुळे महामार्गावर ‘ घडा फोडो’ आंदोलन हाती घेण्यात आले असून बिअर कंपन्यांचे पाणी तोडू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला आहे. बियर कंपन्यांना मुबलक पाणी, पण सामान्य जनतेला ठणठणाट असल्याने ते बिअर कंपन्यांचे पाणी तोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

वाळूज, बजाजनगर आणि सिडको परिसरात सुमारे १० लाख लोकसंख्या आहे. येथील बहुतांश नागरिक कामगार आहेत. या कामगारांना पिण्याच्या पाण्यावर सर्वाधिक पैसा खर्च करावा लागतो आहे. टँकरच्या पाण्यासाठी मोजावे लागत आहेत. तब्बल आठ दिवस नळाला पाणी येत नसल्याने महिलांना रात्रभर जागून पाण्यासाठी वणवण करत राहतात. औद्योगिक वसाहतीमधील बिअर कंपन्यांना हवे तेवढे पाणी मिळते. मग राबणाऱ्या जनतेला का नाही, असा शिवसेनेच्या ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

४० कोटींच्या योजनेचे ‘गाजर’

पाणीपुरवठ्यासाठी ३४ ते ४० कोटी रुपयांची योजना मंजूर असूनही प्रत्यक्षात थेंबभर पाणी मिळाले नाही. गेल्या चार वर्षांपासून केवळ जलवाहिनी टाकून ठेवली आहे. पण पाण्याचा पत्ता नाही. स्थानिक ग्रामपंचायत पूर्णपणे निष्क्रिय झाली असून केवळ ‘कागदी घोडे’ नाचवले जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे सुरेश सोनवणे यांनी केला.

६ मार्चला आंदोलन

या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ६ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता खवडा डोंगर, धुळे-सोलापूर हायवेवर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत ‘घडा फोडो’ आंदोलन होणार आहे.