छत्रपती संभाजीनगर – जालना रोडवरील चिकलठाणा परिसरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या बांधकामाचा छत कोसळलेल्या ठिकाणच्या बचावकार्याला २४ तास उलटून गेले असून दबला गेल्याची चर्चा असलेला कामगार मिळून आला नाही. खंडू विटनुरी, असे त्या कामगाराचे नाव असल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख अशोक खांडेकर यांनी दिली.

खांडेकर यांनी सांगितले की, दिवसभर मलबा काढण्याचे आणि दबल्याची शक्यता वर्तवण्यात आलेल्या कामगाराचा शोध सर्व यंत्रणेने घेतला. मात्र कामगार कुठेही आढळून आला. आता शोधकार्य तूर्त थांबवण्यात आले असून, शनिवारी सकाळी घटनास्थळावरील फळ्या व विहिरीच्या भागात शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.

दरम्यान, घटनास्थळी संबंधित कामगाराच्या कुटुंबीय, नातेवाईकांनी धाव घेऊन आक्रोश व्यक्त केला. घटनास्थळी महापौर समीर राजूरकर, महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांच्यासह प्रमुख अधिकारी व पथक दाखल झाले होते. त्यांच्याकडे दबलेल्या कामगाराच्या नातेवाईकांनी त्यांचे म्हणणे आक्रमकपणे मांडले. यावेळी वातावरण काहीसे तणावपूर्ण निर्माण झाले होते. गर्दीमुळे आणि नेमका शुक्रवारचा आठवडी बाजार असल्याने चिकलठाणा परिसरातील जालना रोडवरील वाहतूकही प्रभावित झाली होती.

जालनारोडवरील द्वारकादास श्यामकुमार कपड्याच्या दालना शेजारी सुरू असलेल्या नव्या बांधकामाचा गुरुवारीच टाकण्यात आलेला छत सायंकाळी ६ च्या सुमारास कोसळला. यामध्ये सुरुवातीला पाच ते सहा कामगार दबले असण्याची भीती व्यक्त केली गेली होती. मात्र छत कोसळण्याचा अंदाज येताच अनेक कामगारांनी तेथून बाहेर धाव घेतल्याने ते बचावले. अशपाक शेख व अंकुश कांबळे हे दोन कामगार जखमी झाले. तर खंडू विटनरी हा कामगार दबला गेल्याची शक्यता अग्निशमन विभागाचे प्रमुख अशोक खांडेकर यांनी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीवरून “लोकसत्ताशी” बोलताना सांगितले.

गुरुवारी (३० ऑक्टोबर) रात्री पावणे आठच्या सुमारास घटनास्थळी जेसीबी, क्रेन आदी यंत्रणा पाचारण करून मलबा काढण्याच्या कामास सुरुवात झाली होती. रात्रभर छताचा मलबा काढण्याचे काम सुरू होते. रात्रीची वेळ असल्याने क्रेन, जेसीबी व अग्निशमन विभागाच्या वाहनांच्या लाईटच्या लाईटमध्ये मलबा काढण्याचे काम सुरू होते.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार नव्याने सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी गुरुवारी छत टाकण्याचे काम सुरू होते. उभे केलेले छताचे लोखंडी पाईप वाकल्याने काही भाग कलला. त्यानंतर संपूर्ण इमारतीचाच छत पत्त्यासारखा कोसळला. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आल्यानंतर एक बंब व अधिकारी, जवान रवाना झाले होते. शुक्रवारीही अग्निशमनची एक यंत्रणा सकाळीच दाखल झाली होती.

महापौर, विरोधी पक्षनेते दाखल

छत कोसळल्याच्या घटनास्थळाला रात्री व सकाळी स्थानिक राजकीय नेत्यांनीही भेट देऊन पाहणी केली. यामध्ये महापौर, एमआयएमचे विरोधी पक्षनेत्यांचा समावेश आहे.