छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा आज अभूतपूर्व औद्योगिक परिवर्तनाच्या टप्प्यावर आहे. एक लाख कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक प्रदेशाचे आर्थिक चित्र बदलेले. मात्र, उद्योगांसोबत शहरांची आणि प्रदेशाच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज आहे. यामध्ये दर्जेदार शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि कौशल्य विकास यावर भर देण्याचा आग्रह करण्यासाठी शहरातील तरुण उद्योजकांनी पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार डॉ. संजीव संन्याल आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोककुमार लेहिरी यांची भेट घेतली.

सीएमआयए या औद्योगिक संघटनेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अर्थर्वेश नंदावत यांच्या उपस्थितीमध्ये धोरण ठरविणाऱ्या प्रमुखांची भेट घेतली. या वेळी मानद सचिव अंजिक्य सावे, मिहिर सौंदलगेकर, सोहम कोटक, सौरभ छल्लानी, हर्षिद मोदाणी, विक्रांत भाले आदींची या वेळी उपस्थिती होती. मराठवाड्याच्या विकासासाठी केंद्र सरकारने कोणती पाऊले उचलावित, आर्थिक वाढीचे यंत्र कसे गतीमान होईल, याची माहिती उद्योजकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. जिल्ह्यात जागतिक वारसा असणारी दोन पर्यटनस्थळे आहेत.

वेरुळ आणि अजिंठा या लेणी पाहण्यासाठी पर्यटकही वाढतो आहे. मात्र, हवाई वाहतूक ही या भागातील समस्या आहे. हवाई वाहतुकीसाठी वारंवार पाठपुरवा करुनही फारसे काही हाती लागत नसल्याचे चित्र आहे. अजिंठा लेणीकडे जाणारा रस्ता अजूनही पूर्णपणे नीट झालेला नाही. यासह पर्यटकांना असणारऱ्या सुविधांचा अभाव असल्याचे नेहमी सांगितले जाते.’ पर्यटनाला आवश्यक असणाऱ्या अनेक बाबींवर चर्चा झाल्याचे उद्योजकांनी सांगितले.
या अनुषंगाने बोलताना सीएमअयएचे अध्यक्ष अर्थवेशराज नंदावत म्हणाले, ‘ एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याने पायाभूत सुविधा, दर्जदार शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकास यात समन्वयाने काम केल्यास मराठवाड्याच्या वाढीचा वेग वाढेल, असा दावा या अधिकाऱ्यासमोर आम्ही केला.

वाढीचा वेग असणाऱ्या शहरांच्या पायाभूत विकासात मोठे बदल करावे लागतील, याची जाणीव सर्व स्तरावर आहे. त्यामुळे बरेच सकारात्मक बदल दिसतील. ’ वाढणारी लोकसंख्या, येणारी गुंतवणूक आणि वाढती लोकसंख्या या तिन्हीचा विचार करुन नियोजनातील बदल केले जात असून पुढील काळात याबाबतची धोरणे ठरवताना प्रयत्न करण्याबाबत चर्चा झाल्याचे उद्योजकांनी ‘ लोकसत्ता ’ बोलताना सांगितले. बैठकीदरम्यान अजिंठा-वेरूळ लेणी, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, देवगिरी किल्ला, पैठण यांसारख्या जागतिक व राष्ट्रीय महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या माध्यमातून मराठवाड्याला हेरिटेज, धार्मिक आणि व्यवसाय पर्यटनाचे राष्ट्रीय केंद्र म्हणून विकसित करण्याची भूमिका मांडण्यात आली.

त्याचबरोबर कृषी प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन, उद्योगाभिमुख शिक्षण आणि कौशल्य विकासावर भर देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘टोएटा’, ‘जेएसडब्ल्यू’, ‘एथर एनर्जी’ आणि इतर आघाडीच्या उद्योगसमूहाने गुंतवणूक केली आहे. मराठवाडा देशातील महत्त्वाचे उत्पादन केंद्र म्हणून वेगाने विकसित होत आहे. मात्र, या औद्योगिक वाढीला पूरक म्हणून रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक वाहतूक, गृहनिर्माण, ऊर्जा, आरोग्य सेवा, शिक्षण, लॉजिस्टिक्स आणि नागरी सुविधा यांचा नियोजनबद्ध विस्तार व्हावा अशी मागणी सीएमआयएचे वतीने करण्यात आली.