छत्रपती संभाजीनगर – नव्याने बांधण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाचा पहिल्याच मजल्याचा गुरुवारीच टाकलेला छत सायंकाळी ६ च्या सुमारास कोसळला.  ही घटना चिकलठाणा परिसरातील आठवडी बाजाराच्या पुढील भागात जालना रोडवरील द्वारकादास श्यामकुमार कपड्याच्या दालनाशेजारी घडली.

यामध्ये पाच ते सहा कामगार दबले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र अग्निशमन विभागाचे प्रमुख अशोक खांडेकर यांनी मिळालेल्या माहितीनुसार एक व्यक्ती दबल्याची प्राथमिक माहिती असल्याचे “लोकसत्ताशी” बोलताना सांगितले.

रात्री पावणे आठच्या सुमारास घटनास्थळी जेसीबी, क्रेन आदी यंत्रणा पाचारण करून मलबा काढण्याच्या कामास सुरुवात झाली होती. रात्री उशिरापर्यंत छताचा काढण्याचे काम सुरू होते. रात्रीची वेळ असल्याने आणि वीजही काही वेळ गेल्याने मलबा काढण्यामध्ये अडथळे निर्माण झाले होते. परंतु वीज आल्यानंतर छताचा मलबा काढण्यास सुरुवात झाली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार नव्याने सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी गुरुवारी छत टाकण्याचे काम सुरू होते. सायंकाळी काम संपल्यानंतर एका विहिरीच्या कठड्यावर उभे केलेले छताचे लोखंडी पाईप वाकल्याने काही भाग कलला. त्यानंतर संपूर्ण इमारतीचाच छत पत्त्यासारखा कोसळला. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आल्यानंतर एक बंब व अधिकारी, जवान रवाना झाले.

घटनास्थळी गर्दी

छत कोसळल्याची माहिती कळतात घटनास्थळी शेकडो लोकांनी धाव घेतली येथे झालेले गर्दी पाहून घटनास्थळावरील सुरक्षारक्षकांनी पुष्कळ लावण्याचा प्रयत्न केला जालना रोडवरच घटना घडलेली असल्याने आणि गर्दीमुळे येथे वाहतूकही मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेली होती. रात्रीपर्यंत अन्य क्रेन,  जेसीबी मागवण्यात येत होते. वाहनांच्या प्रकाशामध्ये मलबा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.

राजकीय नेतेही घटनास्थळी दाखल

छत कोसळला असून, काही कामगार  दबल्याची शक्यता आणि त्याची माहिती मिळताच  काही राजकीय पक्षांचे स्थानिक पातळीवरील नेत्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.