छत्रपती संभाजीनगर : कामगार युनियन आणि जमिनीच्या देवाणघेवाणीतून गुंडगिरी करणाऱ्या मृत बाबा फर्जंद याच्या  मिटमिटा भागातील घरामध्ये गुन्हे शाखेने मध्यरात्री कारवाई करत मोठा शस्त्रसाठा, जिवंत काडतुसे, काही कोटींची रोख रक्कम व १५१.३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले. या संदर्भातील माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी शनिवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या कारवाईच्या माहितीची कुणकुण लागली होती. परंतु याबाबत कमालीची  गुप्तता पाळण्यात आली होती. छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मिटमिटा या भागात केलेल्या कारवाईची संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत छावणी पोलिसांनाही  कुठलीही खबर लागू देण्यात आली नव्हती. बाबा फरजान असे नाव असलेल्या कथित गुंडाच्या सुमारे एक एकरच्या परिसरातील बंगल्यामध्ये मध्यरात्री गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारला. या छाप्यामध्ये अधिकतर कर्मचारी हे नवखे किंवा नेहमीच्या पथकातील नव्हते, अशी माहिती समोर आली.

या छाप्यामध्ये  पाच कोटी २६ लाख २९ हजार ५६० रुपयांची रोख रक्कम आढळून आली असून हे पैसे मोजण्यासाठी पोलिसांना दहा मशीनचा वापर करावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या तब्बल ६३२ एवढ्या संख्येतील जिवंत काडतूस सापडण्यात आले. सोबतच २१ हत्यारे आढळून आली असून त्यातील ४ शस्त्रांचा परवाना मृत बाबा फर्जंद याच्या नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घरामध्ये मद्यसाठाही आढळून आला असून पोलिसांनी ४५ बाटल्या जप्त केल्या आहेत. सोन्याचे १५१.३३ ग्रॅम एवढे तब्बल सोन्याचे दागिने आढळून आले असून त्याची किंमत पोलिसांनी २१ लाख नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी योगेश डोंगर नवसारे यांच्या फिर्यादीवरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोठा फौजफाटा

पोलीस आयुक्तालयातील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा मिटमिटा भागातील मुख्य रस्त्यापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या घटनास्थळी रात्रभर होता. विशेष म्हणजे ही कारवाई शुक्रवारी सकाळपासून सुरू होती. या घटनेबाबत कमालीची गोपनियता राखण्यात आली.

मुद्देमाल असा

संबंधित बंगल्यामध्ये एकूण ५ कोटी ६३ लाख ३७ हजार ९९४ एवढा  मुद्देमाल आढळून आला. ज्यामध्ये शस्त्रास्त्रात १७ चाकू, गुप्ती ३, २ पिस्टल, ४ रायफल्स, ४५ मद्याच्या बाटल्या, २१ लाख ३४ हजार ३५० सोन्याचे दागिने, ८ लाख ९ हजार २४८ रुपये किमतीचे ३.९ किलो वजनाच्या दागिन्यांचा समावेश आहे.