छत्रपती संभाजीनगर : जिल्हा बँके निवडणुकीमध्ये मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे यांच्यामध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे रमल्याचे चित्र दिसत आहेत. यावर ‘ कोण नाराज होतो, कोण खूश हाेतो, असे लक्ष दिले तर कामच करता येणार नाही. लोक पायी चालू देत नसतात आणि घोड्यावरही बसू देत नसतात. आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र आलो आहोत,’ असे स्पष्टीकरण अंबादास दानवे यांनी दिले आहे.
सहकाराच्या निवडणुकीमध्ये पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवले जातात.
मात्र, खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर आमदार अंबादास दानवे यांची महायुतीमधील उठबस राजकीय अंगाने चर्चेत आली होती. मतदानाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी विकास पॅनलच्या वतीने देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये अंबादास दानवे यांचे नावही ‘ महायुती’ च्या नेत्यांच्या पॅनलमध्ये दिसून आले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने बारकाईने लक्ष घातले आहे. या निवडणुकीमध्ये मंत्री अतुल सावे हेही उतरले असल्याने ते जिल्ह्याचे प्रभावी नेते अशी त्यांची प्रतिमा बनू लागली आहे.
त्यांची ही प्रतिमा ते भाजपचे अगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवार या अंगानेही चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने शत – प्रतिशत जागा लढविण्याचा निर्णय घेतला तर सक्षम उमदेवार कोण, याची चर्चा नेहमी असे. अतुल सावे हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरल्यानंतर तेच उमेदवार अशी चर्चा राजकीय गोटात आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जालन्याचे कॉग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनीही भूमीपूत्र विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवली.
मात्र, या पॅनलमध्ये अंबादास दानवे नाहीत. त्यामुळे जिल्हा बँके निवडणुकीमध्ये ‘ दानवे’ महायुतीच्या बाजूला वळल्याची चर्चा रंगली आहे. सहकाराच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील नेत्यांनी सत्तार वगळून सारे असे सूत्र पूर्वी ठरवले होते. मात्र, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी ‘ शिवसेनेवर अन्याय’ अशा आशयाची विधाने माध्यमांमध्ये केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही त्यांनी भेट घेतली. पुढे सुपूत्र समीर यांचा बाद अर्ज वैध ठरला. ते बिनविरोध निवडूनही आले. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये नऊ केंद्रावर १०५३ मतदार मतदान करणार आहेत. सर्वत्र मतदानास सुरुवात झाली आहे.
या पूर्वी आठ उमदेवार बिनविरोधी निवडून आले असून यामध्ये शिवसेनेचे वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांचा समावेश आहे. जिल्हा बँकेचा कारभार भाजपच्या बाजूने होणार की शिवसेनेच्या यावर जिल्ह्यातील राजकारणाचे कल ठरणार आहेत. या निवडणुकीत मतदानाच्या दिवसापर्यंत अंबादास दानवे मात्र चर्चेत राहिले.
