छत्रपती संभाजीनगर : येथील जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाने वर्चस्व मिळवले आहे. या निवडणुकीमध्ये मंत्री संजय शिरसाठ, आमदार विलास भुमरे, रमेश पाटील बोरनारे यांच्यासह बिनविरोध निवडून आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या पाच संचालकांमध्ये नव्याने चार संचालकांची भर पडली आणि नऊ संचालकांसह शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हा बँकेत वर्चस्व स्पष्ट झाले. मात्र, पहिल्यांदाच जिल्हा बँकेत ताकद लावणाऱ्या भाजपचे सात आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे दोन संचालक निवडून आल्याने अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची चुरस वाढण्याची शक्यता आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत पहिल्यांदा ताकद लावल्याने मंत्री अतुल सावे यांच्यासह सात संचालक निवडून आले. भाजपला पूर्वीपासून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने बिनशर्थ पाठिंबा दिला होता. त्यामुळे अध्यक्ष निवडीच्या वेळी पुन्हा चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीमध्ये खासदार संदीपान भुमरे यांचे चिरंजीव आमदार विलास भुमरे, आमदार अब्दुल सत्तार यांचे पूत्र समीर निवडून आले आहेत. यामुळे अध्यक्ष पदी कोण, याची चर्चा निवडणुकीनंतर सुरू झाली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी सकाळी सुरू झाल्यानंतर कॉग्रेसचे खासदार कल्याण काळे वगळता विरोधकांच्या पदरी अपयशच असल्याचे स्पष्ट झाले. मंत्री अतुल सावे, आमदार संजना जाधव, आमदार अंबादास दानवे ही मंडळी निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेल्या देवयानी डोणगावकर यांनी जिल्हा बँकेत संचालक होण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्या विजयी झाल्या. इतर मागासवर्गीय सदस्य मतदारसंघात ४६७ मतदान मिळाले. विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

सहकारात मंत्री सावे यांचा विजय

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वर्चस्व निर्माण करण्याची राजकीय सोय असणाऱ्या जिल्हा बँकेत मंत्री अतुल सावे यांनी निवडणुकीमध्ये २६७ मतदान घेत विजय मिळवला. या विजयामुळे ग्रामीण भागात सावे यांचे नेतृत्व उभे करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. लाेकसभा निवडणुकीमध्ये भाजपने स्वतंत्र उमदेवार देण्याचा निर्णय घेतलाच तर तशी प्रतिमा असणारा नेता म्हणून सावे यांचेकडे आता पाहिले जात आहे.

बिनविरोधी आलेले सदस्य

मंत्री संजय शिरसाठ, संदीप निकम, अनिल बोरसे, गाढे अर्जून, आमदार विलास भुमरे, आमदार रमेश बोरनारे, समीर अब्दुल सत्तार, दिनेश परदेशी असे आठ संचालक बिनविरोध निवडून आले होते.

महायुतीच्या वर्चस्वात अंबादास दानवे विजयी

महायुतीचे वर्चस्व असणाऱ्या शेतकरी विकास पॅनलमधून कपबशी चिन्हावर निवडणूक लढविणारे आमदार अंबादास दानवे यांनी बिगर शेती मतदारसंघात २१० मते मिळवून विजय मिळवला. या मतदार संघात माजी आमदार नितीन पाटील हेही विजयी झाले. जिल्हा बँकेचा कारभार अनेक वर्षे नितीन पाटील यांच्या वडिल सुरेश पाटील यांनी उत्तमपणे सांभाळला होता. खुलताबादचे संजय जाधव या निवडणुकीमध्ये पराभूत झाले. मात्र, त्यांच्या पत्नी सुवर्णा जाधव इतर मागासवर्गीय मतदारसंघातून ५४० मते घेऊन निवडून आल्या आहेत.