छत्रपती संभाजीनगर – चिकलठाणा भागातील जिल्हा रुग्णालय अर्थात मिनी घाटीतील सिटीस्कॅन यंत्र व शस्त्रक्रिया सध्या बंदावस्थेत असून,  जिल्ह्याच्या ग्रामीण परिसरासह जालना, बीड, गेवराई, बुलढाणा भागातून येणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन तपासणी करवून घ्यावी लागत आहे. यासाठी मोठा आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. सिटीस्कॅन यंत्र बंद असून, दुरुस्तीसाठी तज्ज्ञाला पाचारण करण्यात आले आहे, असे जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. भूषणकुमार रामटेके यांनी सांगितले आहे. मात्र, २८ फेब्रुवारीचा शनिवार, पुढचा रविवार आणि सोमवारच्या होळीनंतर मंगळवारची धुळवड, असा सुटीकालीन कालावधी येत आहे. या दरम्यान, दुरुस्ती रखडली तर रुग्णांचे पुन्हा हाल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर-जालना, धुळे-सोलापूर महामार्ग, जळगाव मार्ग, असे तीन प्रमुख जवळून गेलेल्या जिल्हा रुग्णालयात बहुतांश रुग्ण अपघातातील आणले जातात. अपघातातील डोक्याला मार लागलेले, मेंदूत रक्तस्राव झालेले, हाडे मोडलेले, पाठीच्या कण्याला मार लागल्यानंतरची तपासणी, सांध्यांमधील आजार, पक्षाघाताच, मेंदूतील गाठ, छाती, हृदयविकाराचे, फुफ्फुसांचा संसर्ग, क्षयरोग, न्यूमोनिया, हृदय व रक्तवाहिन्या, पोटदुखी, मूत्रपिंडातील खडे, यकृत, कर्करोगाचा संशयासह ऐनवेळी उद्भवलेल्या त्रासाची तपासणी करण्यासाठी सिटीस्कॅन करण्याचा सल्ला किंवा सूचवले जाते.

मात्र, यातील रुग्णांना सध्या जिल्हा रुग्णालयात तपासणी करता येत नसून, त्यांना खासगी रुग्णालयात जाऊन दीड हजार ते अठराशे रुपये खर्च करावे लागत आहेत. अथवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) जावे लागत आहे. जिल्हा रुग्णालय हे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित येत असल्याने तेथे नि:शुल्क तपासणी होते. तर घाटीमध्ये काही रक्कम मोजावी लागते. जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दोन ते अडीच हजारांच्या आसपास रुग्ण दररोज तपासणीसाठी येत असून, त्यात अपघाताचे, प्रसूतीच्या महिला, विविध आजार व तपासणीसाठी येणाऱ्यांचा समावेश असतो.

शस्त्रक्रियागृहही बंद

जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन यंत्र, एक शस्त्रक्रियागृहही बंद आहे. शस्त्रक्रियेतील रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे. तर सिटीस्कॅन करण्यासाठी खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. परिणामी रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. – प्रवीण शिंदे, माजी सदस्य, अभ्यागत समिती, घाटी.

सिटीस्कॅन यंत्र बंद असून, दुरुस्तीसाठी एका अभियंत्याला पाचारण करण्यात आले आहे. लवकरच दुरुस्त करून रुग्णसेवा व तपासणी पूर्ववत होईल. बंद असलेल्या एका शस्त्रक्रियागृहाचे सध्या कामकाज सुरू आहे. इतर दोन शस्त्रक्रियागृहातून रुग्णसेवेचे काम चालते आहे.- डाॅ. भूषणकुमार रामटेके,  अति. जिल्हा शल्यचिकित्सक