छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री कार्यालयातून बोलताेय असे सांगून सहाय्यक पोलिस निरीक्षकाला पहाटे तातडीने पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आली. मात्र, घटनेनंतर मोबाईल फोन बंद ठेवलेल्या आरोपीने शुक्रवारी रात्री फोन सुरू करताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

छावणी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. विवेक जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ८ जुलै रोजी पहाटे ४.३९ वाजता त्यांना एका व्यक्तीचा फोन आला. संबंधिताने स्वतःची ओळख मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. त्याने “पठाण” नावाच्या, मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय असल्याचा दावा केला. शहरातील मिटमिटा परिसरात गंभीर हल्ला झाल्याचे सांगत त्याची तक्रार तातडीने नोंदविण्याचे निर्देश दिले. या फोननंतर डॉ. जाधव तातडीने छावणी पोलिस ठाण्यात पोहोचले. तेथे संबंधित जखमी व्यक्तीला पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी वैद्यकीय मेमो देऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी पाठविल्याचे त्यांना समजले.

नंतर जखमी असिफ खान इस्माईल खान हा पुन्हा पोलीस ठाण्यात आला. त्यावेळी त्याने आपण मुख्यमंत्री तसेच वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या निकट संपर्कात असल्याचा दावा केला. त्याची तक्रार नोंदविताना डॉ. जाधव यांना संशय आला. त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करणाऱ्या व्यक्तीच्या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो फोन बंद असल्याचे आढळले. त्यानंतर आरोपीने पुढील वैद्यकीय उपचारासाठी जात असल्याचे सांगून पोलीस ठाण्यातून निघून गेला. त्यानंतर त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पोलीस तपासात त्याचे दोन्ही भ्रमणध्वनी छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच बंद असल्याचे निष्पन्न झाले.

पुढे डॉ. जाधव यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार शासकीय अधिकाऱ्याची खोटी बतावणी करणे आणि शासनाची फसवणूक करणे याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान आरोपीने शुक्रवारी रात्री मोबाईल फोन सुरू करताच पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला अटक केली. प्राथमिक चौकशीत आरोपी हा तोतया असून राज्य सचिवालय आणि मुख्यमंत्री कार्यालयात प्रभावशाली ओळखी असल्याची खोटी बतावणी करून लोकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारे शासकीय अधिकारी किंवा सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल केली आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.