छत्रपती संभाजीनगर : बहरात असणाऱ्या सोयाबीनचे भाव घसरू लागले आणि अंबाजोगाई तालुक्यातील नायगावमध्ये राहणाऱ्या मीनाबाई चव्हाणच्या कुटुंबात चलबिचल सुरू झाली. मीनाबाईच्या नवऱ्याने शेती आणि मुलींच्या लग्नासाठी काढलेल्या कर्जामुळे आत्महत्या केली होती. या वेळी पुन्हा भाव गडगडले तर चौथ्या मुलीच्या लग्नात घेतलेल्या रुखवतातील भांड्याचे पैसे कोठून द्यायचे, या चिंतेमुळे त्यांना ग्रासले आहे. त्यांच्या पतीने जेव्हा मरणाला कवटाळले तेव्हा म्हणजे २०१४ साली सोयाबीनचा भाव ४४०० रुपये होता. नऊ वर्षांनी आता तो ४२०० पर्यंत खाली आला आहे. २०० रुपयांनी घसरलेल्या भावात जगण्याची होरपळ सुरू असताना मीनाबाईचा मुलाने शेतीऐवजी दुसरे कोणते तरी काम करावे असे ठरविण्यात आले आणि दीड एकराचा शेतमालक आता गॅरेजवर दुचाकी दुरुस्तीसाठी नंदगाववरून अंबाजोगाईचे खेटे मारत आहे. वंशाला दिवा पाहिजे म्हणून मीनाबाई आणि आनंद चव्हाण यांना पाच मुली झाल्या. त्यांच्यापाठी विठ्ठलचा जन्म झाला. दीड एकरात सोयाबीन पेरणाऱ्या मीनाबाईच्या नवऱ्याने दोन मुलींचे लग्न कसेबसे उरकले. कर्ज झाले. शेती पिकणार तरी किती? एकेदिवशी त्याने फाशी घेतली. पुढे मीनाबाई आणि तिच्या सासूने शेतात मजुरी करून दोन मुलींची लग्ने लावून दिली. नात्यांमध्ये मुली दिल्याने दीड लाख रुपयेच हुंडा द्यावा लागला. आता त्यांना रुखवतातील भांड्यांचे हातउसने पैसे देणे बाकी आहे. त्यांचा मुलगा फारसा शिकला नाही. तो एका गॅरेजवर दुचाकी दुरुस्तीचे काम शिकतो आहे. विवाहित मुलींची बाळंतपणे, येती-जातीसाठी मीनाबाई राबत आहेत. सोयाबीनच्या चक्रव्यूहात अडकलेली पुढची पिढी झगडते आहे. हेही वाचा >>>२५ हजार आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून ४० लाख लोकांची तपासणी वडील गेले तेव्हा विठ्ठलला फारसे काही समजत नव्हते. बहिणींचे लग्न करायचे म्हणून विठ्ठल, त्याची आई आणि आजी मिळून मजुरीला जातात. सोयाबीन काढणीचे काम घेऊन त्यातून पैसे उभे करतात. मुलीचे लग्न ठरले की पाहुणे, रावळ्यांकडे हातउसने पैसे घ्यायचे आणि त्यातून लग्न लावायचे. विठ्ठल अंबाजोगाई शहरात गॅरेजवर आता दुचाकी दुरुस्तीचे काम शिकतो आहे. त्याचे वडील गेले तेव्हा सोयाबीनचे भाव आजच्या इतकेच होते. आता दीड एकर जमिनीचा मालक असलेला विठ्ठल आणि त्याच्या घरचे मजूर बनून राबत आहेत. कुटुंबीयांनी मजुरी करून मृत आनंद चव्हाण यांनी घेतलेले सावकराचे कर्ज फेडले. पण विठ्ठलच्या आणखी एका बहिणीचे लग्न बाकी आहे. ती विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाला आहे. पण तीही मजुरी करते. शेतीच्या परिस्थितीविषयीची माहिती देताना एका कोपऱ्यात बसलेली विठ्ठलची आजी म्हणाली, ‘ह्णया वर्षी पुन्हा सोयाबीन पेरले. ते उगवलेच नाही.ह्ण’ सोयाबीनचे बियाणे आता बाजारपेठेत मिळत नाही. घरातलेच पेरा, असे कृषी विभागाकडून सांगितले जाते. लोकसभा निवडणुकीमध्ये शेती प्रश्नामुळे फटका बसल्यावर काही बदल घडतील असे अपेक्षित असताना लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे. मीनाबाईंनीही अर्ज भरला आहे. सोयाबीनच्या चक्रव्यूहात तेवढाच आधार, एवढं त्या कोरडपणाने म्हणाल्या.