छत्रपती संभाजीनगर : सुमारे १५ हजार रिकाम्या गोण्या काळाबाजार करण्यासाठी ठेवून अनुदानित खतांचा काळाबाजार करून शेतकऱ्यांना फसवण्याचा मनसुबा कृषी विभागाच्या पथकाने वंजारवाडीत छापा मारून उधळून लावला. या प्रकरणी रविवारी सायंकाळी दौलताबाद पोलीस चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींमध्ये मध्य प्रदेशातील एक कंपनी व एका कृषी उद्योगाचा समावेश आहे.

कृषी अधिकारी तथा खत निरीक्षक गोविंद रामकिशन पौळ यांच्या फिर्यादीवरून सचिन मारोती निर्फळ, अनिल बालाप्रसाद मंत्री (रा. नांदेड), बालाजी फॉस्फेट लिमिटेड (देवास), गणेश कृषी उद्योग (औरंगाबाद) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२ मे च्या रात्रीनंतर व ३ रोजी पहाटेपर्यंत छाप्याच्या संदर्भातील कारवाई चालल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, वंजारवाडीतील अधाने यांच्या मालकीच्या जागेत मारलेल्या छाप्यामध्ये खतांचा काळाबाजार करण्यासाठी जमवलेल्या साहित्यात ११८.७४ मेट्रिन टन खत, असा २६ लाख ६२ हजार ७६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय डीएपीच्या ७०५ रिकाम्या गोण्या, यूरिया १ हजार ७९७, एनपीके ७४५, एमओपी, पुन्हा एनपीकेच्या हजार ८७२ रिकाम्या गोण्या, डीएपीच्या २०५, युरिया खताच्या अन्य ३६६ गोण्या आढळून. छाप्यामध्ये सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे. रिकाम्पा गोण्या या मधून खतांचा काळबाजार करण्याचा उद्देश प्राथमिकदृष्ट्या मारलेल्या छाप्यातून दिसून येतो, असेही तक्रारीत म्हटले आहे.

खतांचा काळाबाजार काही दिवसांपासून कृषी केंद्राकडून होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहेत. त्यातही खतासोबत अन्य कीटकनाशक औषधी घेण्याची सक्ती केंद्र चालकांकडून करण्यात येत असल्याची तकार आहे.

सहा रुपये किलो, पण विक्री जादा दराने

शेतकऱ्यांना सहा रुपये प्रतिकिलो अनुदानावर मिळणारे खत कंपन्यांना ७४ रुपये किलोने विक्री करून शेतकऱ्यांनाही भेसळ खत पोहोचण्याची व्यवस्था करून ठेवलेल्या गोदामावर छापा मारल्याने भेसळ करणाऱ्यांचे या कारवाईने धाबे दणाणले आहेत.