छत्रपती संभाजीनगर – गणपती उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीतील ट्रॅक्टरला भरधाव आलेल्या हायवाने दिलेल्या धडकेत एक ठार तर पाच ते सहा जण जखमी झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर – जालना महामार्गावर सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली.
घटनेबाबत पिंप्री राजा येथे सोमवारी (ता. १४) रात्री आठच्या सुमारास गणेश आगमन मिरवणुकीत एक भरधाव ट्रेलर घुसला. या ट्रेलरने मिरवणुकीतील गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत ३८ वर्षीय एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले.
जखमींमध्ये गणेश सुरेश पवार (३२), त्यांचा सहा वर्षांचा मुलगा, प्रद्युम्न पाखरे (३२, रा. पिंप्री राजा) आणि समाधान दादाराव सरोदे (२८, रा. डायगव्हाण, ता. छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे. अन्य जखमींची नावे समजू शकली नाहीत.
करमाड पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एमएच-२१-बीएच-७४१६ क्रमांकाचा ट्रेलर दहेगाव-करमाड राज्य मार्गाने करमाडच्या दिशेने येत होता. पिंप्री राजा गावाजवळील वळण रस्त्यावर येताच ट्रेलरचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्याचवेळी गावातून गणेशमूर्ती स्थापनेसाठी मिरवणूक सुरू होती. मिरवणुकीत नागरिकांसह गणेशमूर्ती घेऊन जाणारा ट्रॅक्टर पुढे जात असताना अनियंत्रित झालेला ट्रेलर पाठीमागून आला आणि त्याने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.
धडक इतकी जोरदार होती की मिरवणुकीतील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या अपघातामुळे नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी धावाधाव केली. काही क्षणांतच घटनास्थळी आरडाओरड आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जखमींना मदत करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, जमादार जयसिंग नागलोत यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि शिवसेना कार्यकर्ते कृष्णा पवार यांचे सहकारी व ग्रामस्थांनी जखमींना वाहनांमधून उपचारासाठी रुग्णालयात हलविले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
गणेश आगमनाच्या उत्साहात सुरू असलेल्या मिरवणुकीत अचानक हा अपघात झाल्याने पिंप्रीराजा गावावर शोककळा पसरली. मृताच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, ट्रेलरचे ब्रेक नेमके कोणत्या कारणामुळे निकामी झाले, तसेच अपघाताच्या वेळी ट्रेलरचा वेग किती होता, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. अपघातासंदर्भात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, जखमींची प्रकृती आणि अपघाताची सविस्तर माहिती पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
