छत्रपती संभाजीनगर – हाॅटेल, पोळी-भाजी केंद्रामध्ये काम करणाऱ्या बहुतांश महिलांचे पती कसल्या ना कसल्या व्यसनांचे धनी. त्यांच्या व्यसनापायी घराची दैना होत असल्याचे पाहून आणि भरला संसार मोडण्याची, मुलांच्या शिक्षणाची चिंता वाहात महिलांनी माहेरी मिळालेल्या स्वयंपाकाच्या धड्यांच्या आधारे पोळी-भाजी केंद्रात काम मिळवले. आता सिलिंडरअभावी पोळी-भाजी केंद्रच अडचणीत सापडले असून, अनेक महिलांपुढे संसारगाडा कसा हाकावा, असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सातशे ते आठशेंच्या आसपास लहान-मोठी पोळी-भाजी केंद्र आहेत. टिव्ही सेंटर, हडको, क्रांती चौक, पुंडलिकनगर, पडेगाव, बीड वळण रस्ता, सिडको, बजरंग चौक आदी प्रमुख भागात पोळी-भाजी केंद्रांची संख्या मोठी आहे. यातील काही घरगुती स्वरुपाची, लहानश्या गाळ्यात तर काही व्यावसायिक स्वरुपाची आहेत. अनेक हाॅटेलांमध्ये पोळ्या तयार करणाऱ्या महिला असून, यातील अनेक जणींना पतीच्या व्यसनाधिनतेला कंटाळून आणि मुलांचे शिक्षण, संसाराची चिंता वाहतच काम करण्याशिवाय पर्याय नाही.

बहुतांश पोळ्या लाटणाऱ्या

मोलकरणी-घरेलू महिला कामगारांसाठी २००८ मध्ये कायदा होत असताना आमच्या संघटनेकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये काही महिलांची नोंदणी करून त्यांना कार्ड वितरित करण्यात आले होते. तेव्हा ७८ हजारांवर महिलांची नोंदणी झाली होती. यातील बहुतांश महिला या पोळी-भाजी केंद्रावर व हाॅटेलांमध्ये पोळ्या करणे, भांडी घासण्याची कामे करणाऱ्या होत्या. शहरामध्ये हजारच्या आसपास पोळी-भाजी केंद्र असतील. काही महिलांकडून चालवण्यात येणारी नाश्त्याची सेंटर आहेत. – साथी सुभाष लोमटे, सरचिटणीस, हमाल मापाडी महामंडळ.

महिलांच्या रोजगाराचा प्रश्न

आपल्या पोळी-भाजी केंद्रावर सध्या सिलिंडरच्या टंचाईमुळे काम कमी करण्यात आले आहे. सकाळी व सायंकाळी तीन-तीन तासच काम करून केवळ पोळी-भाजीच केली जात आहे. उर्वरीत पदार्थ बंद केले आहेत. केंद्रावर ३० महिला काम करत असून, सिलिंडर टंचाईकाळ वाढला तर त्यांच्या रोजगाराचा प्रश्न भेडसावत आहे. काही जणींची घरातील परिस्थिती बिकट आहे. पतीच्याही समस्यांमुळे आणि मुलांच्या शिक्षणाच्या भवितव्याच्या चिंतेने त्या केंद्रात काम करतात. – नंदिनी चपळगावकर, संचालक, पोळी-भाजी केंद्र

घरगुती मेसचालक महिला अडचणीत

शहराच्या अनेक भागात घरगुती मेस चालवणाऱ्या महिलांपुढेही सिलिंडर टंचाईने नवा प्रश्न उभा राहिला आहे. हडको भागातील राम मंदिर परिसरातील आश्विनी लाड यांनी सांगितले की, आता चूलच एकमेव पर्याय आहे. सिलिंडर टंचाईची परिस्थिती राहिली तर एक तर मेस बंद करावी लागेल अथवा चुलीवर स्वयंपाक करावा लागेल. मुलांच्या शिक्षणासाठी आणि पतीच्या एकट्याच्या कमाईवर घरसंसाराचा गाडा हाकणे शक्य नसल्याने आपण मेस सुरू केली आहे. दहा माणसं आपल्याकडे सकाळ-संध्याकाळ जेवतात.

किरायादार महिलांना मर्यादा

हडको भागातीलच दीपाली हजारे यांच्या घरगुती मेसवर पोलीस भरतीतील काही विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग जेवणासाठी यायचे. परंतु आता शहरातील सिलिंडर टंचाई पाहता अनेक विद्यार्थी गावी परतले. आता नोकरदारांसाठी मेस चालवण्याचा प्रश्न हजारे यांच्यापुढे आहे. त्यांनी सांगितले की, आपण किरायाच्या घरामध्ये राहतो आहोत. या व्यवसायासाठी अनेक मर्यादा असून, टंचाईकाळात सिलिंडर मिळण्यासाठी २५ दिवसांची अट आहे. सिलिंडर मिळाले नाही तर विजेवरचे उपकरणही वापरणे परवडणारे नाही. त्यावर स्वयंपाकाला बराच वेळ जातो. किरायाचे घर असल्याने आणि दुसऱ्या मजल्यावर राहणे असल्याने चूलही वापरता येणार नाही.