छत्रपती संभाजीनगर – डोसा खाताना हॉटेलमध्येच एका ग्रामसेवकाला दहा हजार रुपयांची लाच घेताना मंगळवारी सायंकाळी पकडण्यात आले. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजोबा विठोबा काथार (वय ५०) असे लाच घेतलेल्या ग्रामसेवकाचे नाव असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली. या सापळ्याच्या संदर्भातील माहिती देताना सांगण्यात आले की, तक्रारदाराकडे ग्रामसेवक राजोबा कथार यांनी २० हजार रुपयाची लाच मागितली होती. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जटवाडा परिसरातील नेम रहाळपट्टी तांडा येथील कार्यभार ग्रामसेवक राजोबा काथार यांच्याकडे आहे. या गावात ग्रामनिधी योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे व घनकचरा प्रकल्प वितरण व्यवस्थापनाअंतर्गत काम करणाऱ्या ठेकेदाराने देयक मंजूर करण्यासाठी ग्रामसेवक राजोबा काथारकडे पाठपुरावा सुरू केला होता. या देयकाची मंजुरी आणल्याचे बक्षीस म्हणून काथारने १६ फेब्रुवारी रोजी २० हजारांची मागणी केली. तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले.

लाचेची रक्कम देणे-घेण्यासाठी टिव्ही सेंटरजवळील एका डोसा पदार्थासाठीच्या हॉटेलमध्ये मंगळवारी सायंकाळी भेटीची वेळ ठरवण्यात आली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण व तपास अधिकारी राजू नांगलोत यांच्या नेतृत्वाखाली पंच हॉटेलमध्ये दाखल झाले. डोसा खात असताना राजोबा काथार यांना तक्रारदाराकडून पंचासमक्ष दहा हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काथार यांच्या घराची झडती घेण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

मराठवाड्यात परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांचे लाचप्रकरण चर्चेत आहे. मुंडे यांनीही ऐपत प्रमाणपत्रासाठी ५० हजारांची लाच मागून २० हजार रुपये त्यांनी लाच मागितल्याचे पुरावे बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला मिळाले होते.