छत्रपती संभाजीनगर – मागील महिन्यात २६ पोलिसांवर व ३०३ शासकीय, कर्मचारी- अधिकाऱ्यांवर विनाहेल्मेट वाहन चालवल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करून पोलीस आयुक्तालयांतर्गत क्षेत्रात हेल्मेट सक्ती होण्याचे संकेत देण्यात आल्यानंतर आता सर्वसामान्य वाहनधारकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.
१ सप्टेंबर रोजी शहरात अप्रत्यक्षपणे हेल्मेट सक्ती मोहीम राबवण्यास सुरुवात केली असली तरी त्यात फार दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा पोलिसांकडून हेल्मेट वापरणाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे. ४ हजारांवर वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
मागील महिन्यात राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते हे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर मुक्कामी आले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर व त्यांच्याशी झालेल्या संवादानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, वाढते अपघात आणि त्यात जात असलेले तरुणांचे बळी याचे प्रमाण कमी करण्याचे मोठे आव्हान आहे.
आमच्या समोर तरुणाईचे अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. काही प्रमाणात अपघाती मृ्त्यूचे प्रमाण कमी करण्यात यशही आलेले आहे. आलेखात ५४० मृत्यू कमी झाले आहेत. मात्र, हा आकडा आणखी कमी करण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी एका तरुणाचा मृत्यू म्हणजे त्या कुटुंबाचेही आणि समाजाचेही मोठे नुकसान असल्याचे सांगितले. तर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी ‘सेव्ह लाईफ’ची व्याप्ती अपघात रोखण्यासाठी सुरू असलेल्या सेव्ह लाईफ फाऊंडेशनचे काम सध्या ११ जिल्ह्यात असून, त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर हेल्मेट वापरण्याचे आवाहन करून अपघातातील मृत्यूचा आलेख कमी करण्याच्या दृष्टीने टाकलेले पाऊल मानले जात आहे.
दुकानांमध्ये गर्दी
शहरातील हेल्मेटच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी उसळल्याचे चित्र आहे. रोपळेकर चौक, क्रांती चौकातील दुकानांमध्ये हेल्मेट खरेदीसाठी वाहनधारक दाखल होत असून, एका-एका घरात दोन-तीन जणांसाठी खरेदी होत असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा जेमतेम आहे. परंतु आधीचा साठा असल्याने तुटवड्याची स्थिती नाही आणि अजूनही अपेक्षित खरेदी सुरू झालेली नाही. मात्र हे चित्र बदलेल, असे दिसते, अशी माहिती येथील एक तरुण व्यावसायिक पाटील यांनी सांगितले.
विना हेल्मेट दुचाकी चालविणारे वाहन चालकास अपघातामध्ये डोक्यास मार लागुन गंभीर जखमी होण्याच्या व अपघातामध्ये मृत्युमुखी झाल्याच्या घटना घडतात. तसेच प्राणांतिक अपघातामध्ये मरण पावणारांचे प्रमाण हे ६०% ते ७०% दुचाकी चालकांचे आहे. हे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने वाहतूक विभाग व सर्व पोलीस स्टेशन असे संयुक्तरित्या १ सप्टेंबर रोजी दिवसभरात हर्सल टी, मुकुंदवाडी चौक, जळगाव टी, केंब्रीज चौक, हायकोर्ट सिग्नल, सेव्हन हिल, दर्गा चौक, आकाशवाणी चौक, अमरप्रित चौक, क्रांतीचौक, सेशन कोर्ट, महावीर चौक, रेल्वे स्टेशन चौक, कार्तिकी चौक, मिलकॉर्नर चौक, नगरनाका, ए.एस. क्लब चौक, ओअॅसिस चौक, कामगार चौक, इ. ठिकाणी विना हेल्मेट दु-चाकी वाहन चालविणारे चालकांवर विशेष मोहीम राबवून एकुण ४ हजार १२० दुचाकी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून ४० लाख ९३,०००/- रुपये दंड आकारण्यात आलेला असून, २७,०००/-रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. – सुभाष भुजंग, सहायक पोलीस आयुक्त
