जालना – दक्षिण मध्य रेल्वेच्या तिकिट खिडकीवरील कर्मचारी मासिक, त्रैमासिक तिकिटांसाठी (सिझन तिकिट) जालना आणि छत्रपती संभाजीनगर स्थानकांवर वेगवेगळे नियम लावीत असल्याने प्रवाश्यांची अकारण ओढाताण आणि कुचंबणा होत आहे. ‘सिझन तिकीट’ ऑनलाइन घेतले पाहिजे, असा कोणताही नियम नसताना तिकीट खिडकीवर तसा सल्ला देऊनही टाळाटाळ करण्यात येत असल्याच्याही तक्रारी आहेत.

गेल्या बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास एका प्रवाश्याने जालना स्थानकावरील तिकिट खिडकीतील कर्मचाऱ्याकडे जालना-छत्रपती संभाजीनगर दरम्यानचे तीन महिन्याचे ‘सिझन तिकिट’ आधार कार्डच्या आधारावर मागितले असता यासाठी आधार कार्ड चालणार नाही, असे उत्तर मिळाले. त्यासाठी रेल्वेचे छायाचित्र असलेले ओळखपत्रच लागेल असे सांगून’ सिझन तिकिट’ नाकारण्यात आले. वास्तविक पाहता नागरिकाकडे अगोदर आधारकार्डाच्या आधारावर काढलेले परंतु शाई पुसटशी झालेले सिझन तिकिटही होते. परंतु उपयोग झाला नाही.

छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्थानकावर उतरल्यावर तेथील तिकिट खिडकीवर जाऊन आधार कार्ड दाखवून या नागरिकाने ‘सिझन तिकिट’काढले आणि ते सहज मिळाले. जालना आणि छत्रपती संभाजीनगर या स्थानकांवरील वेगवेगळ्या नियमांचा अनुभव या नागरिकास आला.

अनेक प्रवाशी तीन महिन्यांचे ‘सिझन तिकिट’ काढतात परंतु त्यावरील अक्षरांची शाई टिकत नाही आणि मुदतीपूर्वीच त्यातील एक शब्दही वाचता येत नाही. त्यामुळे प्रवाश्यांना मात्र अकारण भुर्दड बसतो. मुदत संपलेली नसतानाही प्रवाश्यांवर नव्याने तिकिट काढण्याची वेळ येत आहे. तिकिट खिडकीवर याची ऊत्तरेही मिळत नाहीत.

दक्षिण मध्य रेल्वेच्या मराठवाड्यातील मार्गावर रोटेगाव, लासूर ते छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर ते जालना तसेच जालना ते पुढे परभणी दरम्यानच्या प्रवासासाठी ‘सिझन तिकिट ‘काढणारांची संख्या मोठी आहे. परंतु त्यांच्यासमोर अनेकदा अडचणी येतात. ‘ॲण्ड्राइड मोबाईल फोन’ च्या माध्यमातूनच ‘सिझन तिकिट ‘ घ्या अशी अट आणि आग्रहही नेह‌मीच केला जातो.

कधी-कधी “माझ्याकडे ॲन्डराॅईड मोबाइल फोन’ नाही असा अर्ज लिहून देण्याची अट घातली जाते. यासंदर्भात काही निश्चित आणि अधिकृत नियमावली असेल तर त्याची जाणीव तिकिट खिडकीवरील कर्मचार्‍यांना वरिष्ठांनी करून दिली पाहिजे. तसेच यासंदर्भात स्पष्ट सूचनेचा फलक रेल्वे स्थानकावरील तिकिट वितरित करणाऱ्या कक्षात लावला पाहिजे, अशी मागणी प्रवाश्यांतून होत आहे.