छत्रपती संभाजीनगर – लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असताना आलेल्या संबंधातून जन्मलेल्या बाळाला १ लाख २० हजार रुपयात विक्री करण्यात आले असून, या प्रकरणामध्ये एक तरुणी बाळाची खरेदी-विक्री करत असल्याची तर विक्री करणाऱ्या बाळाच्या जैविक आई-वडिलांनी मिळालेल्या पैशातून एक मोबाईल फोन व काही दागिने खरेदी केल्याची माहिती पुढे आली  आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आतापर्यंत एका डॉक्टरसह सात जणांना अटक केल्याचे पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी सांगितले.

सोनवणे यांनी या प्रकरणाची देताना सांगितले की, मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांन्वये दाखल गुन्ह्याच्या तपासात काही बाबी निष्पन्न झाल्या आहेत. यातील आरोपी वंदना योगेश कांबळे व योगेश रामप्रसाद कांबळे हे दोघेही गेल्या दोन ते तीन वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. त्यांना ५ जुलै २०२६ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व  रुग्णालयात (घाटी) येथे मुलगा झाला होता.

दरम्यान लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कांबळे जोडप्याने त्यांना झालेले बाळ विकायचे असल्याचे  ठरवले. त्यानुसार वंदना कांबळेने कौशल्य पवार नामक एका महिलेसोबत कामाला जात असताना मला बाळ विक्री करायचे असल्याबाबत सांगितले होते. तेव्हा कौशल्या पवार यांनी बाळ विक्रीचे काम माझी मुलगी सीमा रेशवाल ही करते, असे सांगितले होते. त्यानुसार बाळाचा जन्म झाल्यानंतर कौशल्या पवार यांनी वंदना कांबळेच्या सोबत सीमा रेशवालची ओळख करून दिली होती.

त्यानंतर एक महिन्याने जन्मलेले बाळ कांबळे जोडप्याने सीमा रेशवाल हीस एक लाख वीस हजार रुपये रोख घेऊन विकले होते. ते बाळ सीमा रेशवाल हिने तिच्या ओळखीची व नात्यातील महिला संगीता आव्हाड हिस दोन लाख ७० हजार रुपये घेऊन विक्री केले होते. त्यानंतर ते बाळ संगीता आव्हाड हिने तिच्या ओळखीचे तेलंगणातील डॉक्टर सुरेश राजाराम गुंटुका (रा. पिग्गेरला, खतलापूर मंडळ, जिल्हा- जगित्याल) यांना नांदेड येथे जाऊन तीन लाख ५० हजार रुपयात विक्री केले होते. नवजात ते बाळ हे डॉ. सुरेश गुंटूका याने त्यांच्या नात्यातील महिला उमा गंगाधर खटकम (रा. तालागड, हैदराबाद) यांनाही खरेदी केलेल्या रकमेत म्हणजे साडे तीन लाख रुपये घेऊन दिले होते.

दरम्यान सीमा रेशवाल हिस बाळ खरेदी-विक्री व्यवहारातून मिळालेले १ लाख १० हजार रुपयातील ४० हजार रुपये तिची आई कौशल्य पवार यांना मिळाले होते. ही रक्कम कौशल्या पवार यांनी त्यांच्या उसनवारी व्यवहारासाठी खर्च केले, तर मूळ आरोपी आई-वडील वंदना कांबळे व योगेश कांबळे यांनी मिळालेल्या एक लाख वीस हजार रुपये रकमेतून २५ हजाराचे मोबाईल व ६२ हजार रुपयांचे दागिने खरेदी केले होते ते मोबाईल व दागिने गुन्ह्याच्या तपासकामी जप्त केले आहे. तर २७ सप्टेंबर रोजी डॉ. सुरेश गुंटूका व उमा खटकम यांनी नवजात बाळ मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात आणून हजर केल्याने ते देखील ताबा पंचनामा करून ताब्यात घेतले आहे. या बाळाची काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने बाळास सीडब्ल्यूसी (CWC) यांच्या समक्ष हजर करून त्यांनी दिलेले आदेशाप्रमाणे साकार संस्थेच्या ताब्यात दिले असून तशी ताबा पावती देखील केलेली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण सात आरोपी अटक आहेत, असे पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी सांगितले.