छत्रपती संभाजीनगर : एका घरावर छत टाकण्याचे काम सुरू असताना सिमेंट-खडी एकत्र नेले जाणारी ट्रॉली प्रवाह सुरू असलेल्या लोंबकळेलेल्या विद्युत तारेला चिटकली. या ट्रॉलीतला सिमेंट-खडीचा माल उतरवण्यासाठी गेलेल्या दोन मजुरांचा विद्युत धक्का बसून जागीच मृत्यू झाला. ही घटना मिसारवाडी भागात रविवारी सायंकाळी घडली.

या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा नोंद दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. विशाल अंकुश चव्हाण (२६, रा. जयभवानीनगर) आणि मलकन बापू जाधव (३५, रा. विठ्ठल मंदिराजवळ, मुकुंदवाडी) अशी मृत मजुरांची नावे आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मिसारवाडीतील एका गल्लीत एका घराचे बांधकाम सुरू होते. रविवारी छत टाकण्याचे काम मजूर मंडळी करत होते. त्यासाठी रस्त्याच्या मधोमध खड्डा खोदून सिमेंट मिक्सर ट्रॉली उभी केली होती.

सिमेंट-खडी-वाळूचा मिश्रीत माल वर नेण्यासाठी बसवलेल्या स्वयंचलित लिफ्टच्या अगदी वरील भागावरून विजेच्या तारा गेल्या होत्या. छत टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू असताना या लिफ्ट ट्रॉलीचा विद्युत तारांना स्पर्श झाला. याच वेळी सिमेंट माल घेण्यासाठी गेलेल्या या विशाल व मलकन या दोन मजुरांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते दूर अंतरावर फेकले गेले. या घटनेची माहिती सिडको पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर दोन्ही मजुरांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) दाखल करण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

घरातील कमावता पुरुष गेला

मृत विशाल चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि अवघ्या एक वर्षाची मुलगी असा परिवार आहे. विशालच्या वडिलांचे अगोदरच निधन झालेले असल्याने घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आणि मोठ्या भावावर होती. विशालच्या अचानक जाण्याने दोन्ही मुलांच्या डोक्यावरचे पितृछत्र हिरावले गेले.

नातेवाईकांचा टाहो

दोन्ही मजुरांच्या मृत्यूची वार्ता नातेवाईकांना समजताच त्यांनी घाटीकडे धाव घेतली. तेथे त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. यावेळी त्यातील काहींनी कारवाईची तर काही नातेवाईकांनी नुकसान भरपाईची मागणी केली होती.