छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणाविरोधात पुण्यात सोमवारी एमपीएससीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आंदोलन केले. तर मंगळवारी याच प्रश्नावर एमपीएससीचा अभ्यासक करणारी मराठवाडा-विदर्भातील विद्यार्थी-विद्यार्थिनी क्रांती चौकात एकत्र येऊन घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांनी पुण्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्येही मोठी गर्दी करून आंदोलन केले.

सकाळी ११ वाजताच्या सुमारास हजारोंच्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी हातात वेगवेगळ्या घोषणांचे आणि निषेधाचे फलक घेऊन दाखल झाले. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष-सचिवांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही लावून धरण्यात आली होती. सुमारे दोन तासांवर विद्यार्थी-विद्यार्थिनी क्रांती चौकात ठिय्या मांडून बसले होते.

अचानकपणे तरुणाई रस्त्यावर उतरलेली पाहून आणि हजारोंची संख्या पाहून अनेकांनी आंदोलकांमधील रोष पाहण्यासाठी क्रांती चौकात धाव घेतली. यावेळी क्रांती चौकातील वाहतुकीची काही काळ कोंडी झाली होती. तरुणाई धिटाईने घोषणाबाजी करताना दिसून येत होती. विद्यार्थ्यांसोबतच विद्यार्थिनींचीही संख्या या आंदोलनात लक्षणीय होती.

शोलेतील संवादाचे फलक

शोले चित्रपटातील गब्बरसिंगच्या तोंडी असलेला ‘कितने आदमी थे’ या संवादाचे ‘अब तक कितनी बार पेपर लीक हुई’ अशा वाक्याचे फलक आणि त्यावर अभिनेता अमजदखान यांचा शाेले चित्रपटातील वेशभूषेतील छायाचित्र लक्षवेधून घेत होते. काॅमर्सचा अन्याय वाचवा, मागील दोन वर्षांमध्ये आयोगाची चांगली कामे… असे लिहिलेल्या फलकावर रिकाम्या जागेकडे अंगुलीनिर्देश करणारे चिन्हं असलेला फलक, अशी अनेक फलके हातात घेऊन विदयार्थी-विद्यार्थिनी घोषणाबाजी करत असल्याचे चित्र क्रांती चौकात पाहायला मिळाले. दूरचित्रवाणीवर अनेकवर्षे सुरू असलेल्या सीआयडी मालिकेतील अभिनेत्यांच्या छायाचित्रांचे फलकही हातात घेऊन तरुणाई घोषणा देत असल्याचे दिसून आले.

औषध निरीक्षकपदाच्या परीक्षेचा पेपर फुटला तेव्हाच आमचा एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेवरचा विश्वास उडाला. विद्यार्थ्यांमध्ये संताप, शंका निर्माण झाल्या आहेत. कम्बाईनचा कटऑफ मागील काही काळापूर्वी ४३-४५ च्या आसपास लागायचा. परंतु आता तो कटऑफ ६२-६५ च्या घरात गेला आहे. प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. – एक विद्यार्थी.

एमपीएससीच्या माजी अध्यक्ष, सचिवांच्या कार्यकाळातील कारभाराची चौकशी करण्यात यावी. कारण या काळात देण्यात आलेल्या नियुक्त्यांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे चौकशी व्हावी. – एक विद्यार्थी.

पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी. सरकारने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी आंदोलनामध्ये सहभागी विद्यार्थिनी वर्गातून करण्यात आली.