छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय व्याघ्रजनन केंद्र ठरत असल्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. मागील ३० वर्षांमध्ये ‘सिद्धार्थ’ हे पिवळय़ा व पांढऱ्या रंगाच्या तब्बल ४५ वाघांचे जन्मस्थळ ठरले आहे. सध्या येथे पिवळे व पांढरे मिळून १४ वाघ आहेत. त्यात पांढरे वाघ सहा आहेत. सिद्धार्थमधील पांढऱ्या अर्पिता वाघिणीने गुरुवारी सकाळी तीन बछडय़ांना जन्म दिला. तिघेही बछडे पांढरे आहे. सिद्धार्थमध्ये वीर व अर्पिता ही पांढऱ्या वाघांची जोडी आहे.
गुरुवारी अर्पिता प्रथमच प्रसूत झाली. दीड महिन्यापूर्वी, २१ जुलै रोजी पिवळय़ा पट्टय़ांच्या ‘समृद्धी’ वाघिणीने एका बछडय़ाला जन्म दिला आहे. २५ डिसेंबर २०२० मध्येही समृद्धीनेच पाच बछडय़ांना जन्म दिला होता. समृद्धी वाघीण आतापर्यंत चार वेळा प्रसूत झाली असून, १३ बछडय़ांना जन्म दिला आहे. सन २०२० पूर्वी समृद्धीने दोन वेळच्या प्रसूतीमध्ये सात बछडय़ांना जन्म दिलेला आहे. सिद्धार्थमधील दहा वाघांचा आतापर्यंत वयोमानापरत्वे मृत्यू झालेला आहे. तर मागील वर्षभराच्या काळात एका पिवळय़ा वाघिणीने जन्म दिलेल्या दोन बछडय़ांचा मृत्यू झालेला आहे.




पंजाबमधील चतबीर प्राणिसंग्रहालयातून दोन वाघ व दोन वाघिणी, अशा दोन जोडय़ा साधारण ३० वर्षांपूर्वी येथे आणण्यात आल्या होत्या. त्यांच्यापासून सुरू झालेला जन्मदराचा आलेख ४५ वाघांच्या जन्मापर्यंत वाढलेला असून, त्याला येथील अतिथंडी किंवा अतिउन्हाळा नसलेले वातावरण कारण मानले जात आहे. सिद्धार्थमधून राज्याबाहेरील प्राणिसंग्रहालयांतही वाघ पाठवण्यात आलेले आहेत. आतापर्यंत सोळा वाघ मध्यप्रदेशातील इंदूर, सतना, टाटा प्राणिसंग्रहालय, तसेच मुंबई, पुणे, बोरिवली येथील प्राणिसंग्रहालयातही पाठवण्यात आलेले आहे. विस्ताराच्या प्रकल्पात सिद्धार्थमधील प्राणीसंग्रहालयाचे स्थलांतर हे पडेगावजवळील सफारी पार्कमध्ये होत आहे.
सिद्धार्थमधील प्राणिसंग्रहालयात आतापर्यंत जन्मलेल्या वाघांची संख्या ४५ झाली आहे. तर पांढऱ्या अर्पिता वाघिणीने गुरुवारी तीन बछडय़ांना जन्म दिला असून, पांढऱ्या वाघांची संख्या सहा झाली आहे. प्राणिसंग्रहालयातील पांढऱ्या व पिवळय़ा वाघांची एकूण संख्या १४ झाली आहे. – विजय पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक, सिद्धार्थ उद्यान