छत्रपती संभाजीनगर – सोबत राहणाऱ्या ओळखीतील व्यक्तीच्या बहिणीसोबतच तरुणाचे सूत जुळले. प्रेमांकूर फुटला. पण संशयाच्या भूताने घात केला. प्रेयसीचे दुसऱ्यासोबतही गुफ्तगू सुरू आहे, या संशयाने मनात सारे विषकल्लोळ सुरू झाला अन प्रेमप्रकरणाचा शेवट खुनाच्या घटनेतून झाला. आता प्रेयसीचे भाऊ आपल्याला सोडणार नाहीत म्हणून प्रियकराने तिचा मृतदेह कपड्यात गुंडाळून मोकळ्या मैदानावर टाकून पुन्हा काहीच घडले नाही, या आविर्भावात वावरू लागला आणि प्रेयसीच्या भावासोबत स्वतःच शोधायला निघाला. अखेर पहाटे दूध आणायला एका मोकळ्या मैदानातून निघालेल्या महिलेला हवेने उडालेल्या कपड्यातील मृतदेह आढळला आणि पोलिसांपर्यंत त्याची माहिती पोहोचली. पोलिसांनी तपास करून प्रियकराला बेड्या ठोकल्या तेव्हा सारे गूढ उलगडले.

दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण सुरु असल्याच्या संशयावरुन प्रेयसीची गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपीने दिली. या प्रियकराला जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. खेडेकर यांनी १९ जानेवारी रोजी ठोठावली. भोलाकुमार कुंजल मास्‍टर कुमार (२८, रा. गोरखपुर, उत्तरप्रदेश ह.मु. स्‍वराजनगर, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपी प्रियकाराचे नाव आहे.

प्रकरणात राहुल बरखू राय (२०, रा. मुकुंदवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राहुल रॉय हा कुटूंबासह मुकुंदवाडीतील स्वराजनगरात राहतो. आरोपी भोलाकुमार हा देखील त्‍यांच्‍यासोबत राहत होता. इंदुमती आणि भोलाकुमार यांचे काही वर्षापासून प्रेमप्रकरण सुरु होते. पण इंदुमतीचे आणखी दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण सुरु असल्याचा भोलाकुमारला संशय होता. या प्रकरणावरून इंदुमती आणि भोलाकुमार यांच्यात वाद झाला होता. वादानंतर भोलाकुमारने इंदुमतीचा मोबाइलही जाळला होता. या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागताच राहुलचा मोठा भाऊ सुनील याने भोलाकुमार याला दुसरीकडे रुम बघण्यास सांगितले होते. त्यानुसार भोलाकुमार हा स्वराजनगरात किरायाने राहण्यासाठी गेला होता.

प्रियसीने आपल्याला सोडल्याचा राग त्याच्या मनात होता. भोलाकुमार याने ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास इंदुमतीला मारहाण केली. त्यानंतर तिचा ओढणीची गळा आवळून खून केला व मृतदेह गुंडाळून तो मोकळ्या मैदानात आणून टाकला. त्‍यानंतर इंदु घरी आली नाही म्हणून आरोपी हा फिर्यादीसोबत इंदु शोधण्‍यासाठी फिरला. दुसऱ्या दिवशी पहाटे दुध घेऊन जात असलेल्या महिलेला इंदुमतीचा मृतदेह आढळून आला.प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

खटल्याच्या सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी लोकाभियोक्ता अरविंद बागुल यांनी ११ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात तीन जणांची साक्ष महत्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने भादंवी कलम ३०२ अन्वये जन्मठेप व १० हजारांचा दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.