छत्रपती संभाजीनगर – घराबाहेर बसलेल्या ८० वर्षांपेक्षा अधिकच्या वयाच्या वृद्धेवर वादळ-वारे सुटलेल्याने घरात नेण्याचा बहाणा करून अत्याचार केल्याच्या आरोपाखाली शेजारच्याच एका २८ वर्षीय तरुणावर सोमवारी मध्यरात्री पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन अहिरे, असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पीडित महिलेला तपासणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) पाठवण्यात आले असून, पीडितेचे नेमके वय आधारकार्ड तपासून काढले जाणार असल्याची माहिती उपनिरीक्षक राम बारहाते यांनी दिली. दरम्यान या घटनेनंतर मध्यरात्री मोठा जमाव पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी होत होती. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली. या माहितीला उपनिरीक्षक बारहाते यांनी दुजोरा दिला.

या प्रकरणाबाबत घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी पीडितेची स्त्रीरोग विभागात तपासणी करून उपचार करण्यात आले आहेत, असे सांगितले. तर घाटीच्या स्त्रीरोग विभागाचे प्रमुख डॉ. एस. एन. गडाप्पा यांनी गोपनीय अहवाल वरिष्ठांकडे सादर केल्याची माहिती दिली. पैठण तालुक्यातील पाचोड येथील एका भागात वरील घटना सोमवारी सायंकाळी घडली पीडित ऐंशी वर्षीय वृद्धा घरात एकटीच राहते. तिच्या मुलींचे लग्न झाले तर मुले रोजगारानिमित्त बाहेरगावी असतात.

कामकाज होत नसल्याने व शरीर थकल्याने ती दिवसभर घराच्या बाहेर ओट्यावर बसून असते. सोमवारी (ता. १ जून) सायंकाळच्या सुमारास वादळी वारे सुरू झाल्याने शेजारी राहणारा अठ्ठावीस वर्षीय रोहन अहिरे याने ‘त्या’ वृद्धेस घरात नेऊन सोडण्याचा बहाणा केला व तिचेसोबत आश्लिल चाळे करू लागला. महिलेने त्यास प्रतिकार केला. मात्र ‘त्या’ तरुणाने बळाच्या जोरावर पीडितेवर अतिप्रसंग केला. शेजारी राहणारी एक महिला घरात गेली असता तिने अतिप्रसंगाचा प्रकार तिने पाहिला, त्यातच त्या वृद्धेने घडला प्रकार तिला सांगितला. या घटनेची बातमी गल्लीत पसरताच घरासमोर प्रचंड जमाव जमला व त्यांनी त्या वृद्धेला पोलिस ठाण्यात आणले. पोलीस ठाण्याच्या प्रांगणात जमाव गोळा होऊन त्या सर्वांनी तातडीने त्या तरुणाविरुद्ध कारवाईही करण्याची मागणी केली. पोलीस उपनिरीक्षक राम बाराहते व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या तरुणास ताब्यात घेतले. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास रोहन आहिरे याचेविरुद्ध पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

रुग्णालयात वेगळा जबाब ?

पीडितेला घाटीत दाखल केल्यानंतर तिने वैद्यकीय तपासणी करू देण्यास नकार दिला असून, “असे काही घडलेच नाही” असा जबाब दिल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून समजले. त्यामुळे घटनेविषयी तर्कवितर्क लढवण्यात येत असल्याची चर्चा आहे.