छत्रपती संभाजीनगर – आठ वर्षाचा अर्जुन आता त्याचे नाव इंग्रजी आणि मराठीतही लिहू शकतो. आपल्या झोपडी बाहेर समोरच असलेल्या भव्य-दिव्य हाॅटेलवरील पाट्याही तो वाचतो. कार्तिक तर चार-पाच वर्षांचेच चिमुरडे पोर. पण पेन-वही-पाटी दिसली की लिहिण्यासाठी पुढे सरसावतो. त्याची बहीण रोषणी व शेजारीच चिटकून राहणारी शिवानी, रागिणी, साहिलही आता भरउन्हात चार बल्ल्यांना झिरमिरत्या हिरव्या कापडाच्या (नेट) आच्छादनाने लपेटलेल्या ‘वर्गात’ येऊन उजळणीची आळवणी करतात. त्यांचे खेळही एक-दोन-तीन, अशा आकडेमोडीवर आधारित… त्यांच्या या ‘शाळे’ला ‘पालावरची अभ्यासिका’ हे नाव आहे. वसई-विरारहून आलेले राघवेंद्र मेहता हे वयाची साठी पार केलेले स्वयंसेवक या शाळेतील एकमेव शिक्षक.

बीड बाह्य वळण रस्त्यावर कासलीवाल मार्बल या प्रतिष्ठितांच्या वसाहतीकडे वळतानाच्या मोकळ्या जागेत शंभरच्या आसपास संख्येने असलेल्या इवल्या-इवल्या झोपड्या दिसतात. पारधी, जोगी समाजाच्या मंडळींच्या या झोपड्या आहेत. यातील पुरुष मंडळी रोजगारावर जाणारी. जवळपास सर्वच निरक्षर किंवा अल्पशिक्षित. अवघड रोजंदारीतून मिळणाऱ्या रोजगारावर कुटुंब कबिला चालवला जातो. घरातील बायकांना दिवसभर प्लास्टिकच्या डब्यांमध्ये पाणी आणून स्वयंपाक आणि मुलांची देखभाल करण्याचे काम. पाच ते १५ वर्षाच्या वयातील पन्नासपेक्षा अधिक मुले या झोपडपट्टीतला किलबिलाट. यातील अनेकांकडे आई-वडिलांचे ॲण्ड्राॅईड मोबाईल फोन. पण एकही मुलगा कुठल्या शाळेत जात नाही. झोपडपट्टीतच खेळणे, आक्रमकपणे भांडणे, मस्ती करणे. मुलगी असेल तर तिने आई-आजीसोबत वणवण भटकून पाणी आणणे.

या मुलांची नावे शाळेत नोंदवायच्या काय अडचणी ? या प्रश्नावर त्यांचे सर राघवेंद्र मेहता सांगतात की, झोपडपट्टीतील काही मुला-मुलींचा परिवार मूळचा परतूरचा. तेथे त्यांची घरकुलं आहेत, पण येथे शाळेसाठी आवश्यक कागदपत्रे नाहीत. जन्माच्या तारखा नाहीत. त्यांच्या पालकांपुढे रोजगाराचा प्रश्न असल्यामुळे ते परतूरहून येथे स्थलांतरित झालेले. शिक्षणापासून कोसोदूर. झोपडपट्टीतील मुले तशी ‘शाळा-बाह्य.’ मनसोक्त खेळणे आणि मोबाईल फोन पाहणे, यातच त्यांचा दिवस जातो. प्रसंगी आक्रमकही होतात. कुठलीही शिस्त नाही. त्यामुळे त्यांना साक्षर करण्यासाठी ‘पालावरची अभ्यासिका हा प्रकल्प भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान द्वारा संचालित भटके विमुक्त विकास परिषद सेवा प्रकल्पांतर्गत जानेवारीपासून राबवण्यात येत आहे.

शहरात चाळीसच्या आसपास झोपडपट्ट्या आहेत. यातील चारच ठिकाणी ‘पालावरची अभ्यासिका’ प्रकल्प चालवण्यात येतो. त्यातला एक बीड बाह्य वळण रस्ता. याशिवाय चिकलठाणा परिसरातील सावित्रीबाई नगर, माळीवाडा व अन्य एका ठिकाणी चालवण्यात येतो. बीड रस्त्यावरील शाळेत शोभना-डे या शिक्षिकाही येथे येऊन शिकवतात, त्या सध्या गावाकडे गेलेल्या आहेत. या शाळेला एका शिक्षकाची गरज आहे, शिक्षक मिळाला तरी आपल्याला पुढच्या काही प्रकल्पांसाठी काम करायचे आहे, असे मेहता यांनी सांगितले.

संगणक साक्षरतेवर भर

झोपडपट्टीतील मुलांना शिक्षणाविषयीची गोडी लावणे व त्यातून संगणक साक्षर, कौशल्ययुक्त कसब शिकवणे, मुलींना ड्रेस डिझायनरसारखे काम शिकवण्याचे पुढील उद्दिष्ट ठेवून प्रकल्पाचे काम सुरू आहे. – राघवेंद्र मेहता,