छत्रपती संभाजीनगर – येथील ऐतिहासिक आणि काल्पकतेचे अदभूत स्थळ मानले गेलेल्या पानचक्कीतील उंचावरून कोसळणाऱ्या पाण्यासाठी आर्टिफिशन “बुद्धिमत्ते”चा वापर करण्यात आला असून, नैसर्गिकरीत्या पडणारे पाणी सध्या बंद झाले आहे. परिणामी पानचक्कीतील ५० बाय ७५ फूट रुंद आणि जवळपास बाराफूट खोल असलेल्या हौदातील पाणी हिरवेगार पडले असून, त्यातील मासे मृत होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याशिवाय पाण्यात कचरा वाढला असून, साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्याने पर्यटकांची संख्याही रोडावली आहे.
येथील पानचक्की ही वास्तू स्थापत्य रचनेचा अदभूत आविष्कार असून, छत्रपती संभाजीनगर शहर ज्याने वसवले त्या मलिक अंबरने नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी नहर तयार केली होती. या नहरीतूनच पाण्याचा अखंड स्रोत पानचक्कीपर्यंत होता. पानचक्कीत उंच भागातून लहानशा धबधब्याप्रमाणे पाणी कोसळत असून, हा एक अदभूत आविष्कार पर्यटकांचे आकर्षण ठरलेला आहे. ऐतिहासिक स्थळ म्हणून पानचक्की जगभर प्रसिद्ध पावली असून, वर्षभरात लाखोंच्या संख्येने देशी आणि विदेशी पर्यटक भेट देऊन पाहणी, अभ्यास करतात. परंतु सध्याची पानचक्कीची अवस्था “कृत्रिम’ असून, कोसळणारे पाण्याचा स्रोत नैसर्गिक नाही असे या वास्तुची देखभाल व्यवस्था असलेल्या वक्फ बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
बोर्डाचे अधीक्षक साहील पठाण यांनी विद्युतपंप लावून पानचक्कीवरून पाणी सोडले जात असल्याचे सांगितले. तर वक्फ मंडळाचे पानचक्कीच्या देखभालीकडे कायम दुर्लक्ष होत असून, संरक्षण भिंतीवर मोठमोठी झाडेझुडपे वाढून बसली आहेत. पाण्याची पावडर टाकून साफसफाई केली जात नसल्याने वास मारला जात असून, त्यामुळे मासे मरण्याचे प्रमाण वाढले आहे. कंत्राटी पद्धतीने साफसफाई आणि देखभालीची व्यवस्था असून, वक्फ मंडळाचा कंत्राटदारावर वचक राहिलेला नसल्याने एका ऐतिहासिक वास्तुची दुरवस्था होत आहे. मंडळाच्या कार्यालयाच्या आवारात दुसरा एक मोठा पाण्याचा हौद असून, त्याखाली एक वातानुकूलित सभागृह आहे. परंतु पाण्याच्या हौदामध्ये कचरा-कुचरा असून, त्यातील मासेही मृतावस्थेत दररोज आढळून येत आहेत, असा आरोप पानचक्कीची माहिती असणाऱ्या काही व्यक्तींकडून करण्यात आला.
यावर वक्फ मंडळाचे साहील पठाण म्हणाले, पानचक्कीवरील पाणी नैसर्गिक पद्धतीने सध्या पडत नाही. नहरीमधील पाणी आटल्याची स्थिती आहे. नहरींच्या भागात अवैध वीटभट्टया वाढलेल्या आहेत, त्याविषयी महापालिकेला कळवण्यात आले आहे. पण कार्यवाही काही झाली नाही. हातपंपाच्या पाण्यावर हौदात पाणी अपेक्षित स्तरापर्यंत साचत नसल्याने माशांना ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. परिणामी मासे मरून पडतात. कंत्राटदाराकडून स्वच्छता केली जाते. कंत्राटाचेही दरवर्षी नूतनीकरण होते.

