छत्रपती संभाजीनगर येथे एका सरपंचाने अनोख्या पद्धतीने केलेल्या आंदोलनाची राज्यभरात चर्चा होत आहे. शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून देण्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी लाच मागत होते. त्यामुळे संतप्त सरपंचाने गळ्यात २ लाख रूपयांच्या नोटांची माळ घालून पंचायत समितीबाहेर पैशांची उधळण केली. अधिकाऱ्यांना दीड-दीड लाख रूपये पगार असतानाही विहिरी मंजूर करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागतात, असा आरोप सरंपचाने केला.
नेमकं घडलं काय?
गेवराई पायगा येथील मंगेश साबळे असं या सरपंचाचं नाव आहे. मंगेश साबळे यांनी फुलंब्री पंचायत समितीच्या कार्यालयासमोर ही पैशांची उधळण केली आहे. शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्याकडून लाच मागितली जात असल्याचा आरोप मंगेश साबळे यांनी केला होता. त्यानंतर फुलंब्री पंचायत समितीच्या कार्यालयासमोर त्यांनी दोन लाख रूपयांच्या नोटांची उधळण करत आंदोलन केलं आहे.
हेही वाचा :
याप्रकरणी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना मंगेश साबळे म्हणाले, “भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवून गावागावत प्रचार केला. भ्रष्टाचार बंद करेन हा विषय चव्हाट्यावर आणून निवडणूक लढवली. पैसेवाल्या लोकांसाठी बऱ्याच विहिरी बांधल्या. आता गरिबांसाठी विहिरी बांधायच्या हा उपक्रम हाती घेतला. जलविकास सिंचनसाठी सरकार ४ लाख रूपयांचं अनुदान देतं. त्या उपक्रमाअंतर्गत २० विहिरींच्या फाईल्स मनरेगाच्या माध्यमातून गटविकास अधिकाऱ्यांकडे दाखल केल्या.”
हेही वाचा :
“याबाबत गटविकास अधिकाऱ्यांशी बोललो. तेव्हा गटविकास अधिकाऱ्यांनी रोजगार सेवक आणि इंजिनिअरजवळ टक्केवारी सांगितली. यात १२ टक्के म्हणजे १२ हजार गटविकास अधिकारी, इंजिनिअर १५ हजार, अधिकारी ५ हजार आणि बिल काढण्यासाठी पुन्हा १० रूपयांची लाच मागण्यात येत होती. ही साखळी बऱ्याच वर्षापासून सगळीकडे सुरू आहे,” असं मंगेश साबळे यांनी सांगितलं.