छत्रपती संभाजीनगर – रेड्यांना झुंजवणे किंवा स्पर्धेत सहभाग घेणे आयोजकांसह म्हशी मालकांच्या आणि सहभागी होणाऱ्यांच्या अंगलट आले आहे. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात काही म्हशी मालकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळाई भागातील हिमालय पब्लिक स्कूलजवळील खुल्या जागे मध्ये आयोजित केलेल्या या स्पर्धेवरून पीपल फाॅर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल इंडियाकडून (पेटा) नाराजी व्यक्त करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर चिकलठाणा पोलीस ठाण्यातील हवालदार दीपक दादाराव देशमुख यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन (सुमोटो) केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

अबरेस पटेल, शेख पटेल, फिरोज सय्यद, ऋषिकेश हिवाळे व इतर म्हशींचे मालक, हॅंडलर्स, सह-आयोजक व सहभागी व्यक्तींविरुद्ध २४ ऑगस्ट रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पेटाचे मीत अशर यांनी शुक्रवारी दिली. तक्रारीनुसार ९ ऑगस्ट रोजी देवळाई गावातील हरी आेमनगर येथील खुल्या जागेत बेकायदेशीररीत्या रेड्यांच्या झुंजीचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी व्यक्ती व इतर साथीदारांनी मिळून दोन रेड्यांना-म्हशींना आमने-सामने आणून, हातांनी व काठ्यांनी मारहाण करून त्यांना चिथावणी देऊन आपआपसात बक्षीसासाठी झुंजी लावत लढण्यास भाग पाडले. प्राण्यांना गंभीर दुखापत, वेदना व इजा होईल, हे माहिती असतानाही मनोरंजनासाठी आणि शर्यतीच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आला. स्पर्धेच्या ठिकाणी कोणत्याही सुरक्षेच्या किंवा बॅरिकेट्सच्या व्यवस्थांशिवाय मोठी गर्दी जमवण्यात आली होती. भडकलेल्या प्राण्यांमुळे उपस्थित नागरिक, लहान मुले, पादचाऱ्यांच्या जिवाना आणि शारीरिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला होता.

याप्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ कलम ३२५ प्राण्यांना मारणे, अपंग करणे किंवा दुखापत पोहोचवणे, कलम ६२ नुसार दुसऱ्याच्या जिवाला किंवा वैयक्तिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे कृत्य करणे, कलम ३(५) समान उद्देशाने एकत्र येऊन गुन्हा करणे तसेच प्राण्यांवर क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा कायदा, १९६० चे कलम ३ व ११ (१) (अ) प्राण्यांना अनावश्यक वेदना किंवा हाल सोसावे लागतील, असे वागवणे, कलम ११ (१) (१) प्राण्यांना अपंग करणे किंवा इजा पोहोचवणे, कलम ११ (१० (म) (२) प्राण्यांना आपआपसात लढण्यासाठी चिथावणी देणे, कलम ११ (१) (एन) प्राण्यांच्या झुंजीसाठी जागा आयोजित करणे किंवा व्यवस्थापन करणे, महाराष्ट्र जुगार कायदा कलम (१२ (अ) प्रमाणे आरोपी १ ते ४ व इतर सहभागी लोकांविरुद्ध आलेल्या फिर्यादीनुसार गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.