छत्रपती संभाजीनगर : देशातील केवळ एका परीक्षेचा पेपर फुटलेला नाही. शिक्षण व्यवस्थेमध्येच दोष आहेत. ते दूर करण्यासाठी गेल्या १६ दिवसापासून जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. ते दूर करण्यासाठी आंदोलन करणारी मंडळी ‘ व्हायरस ’ नाही तर ‘ व्हॅक्सीन ’आहे, असे मत कॉक्राेच जनता पक्षाचे प्रमूख अभिजीत दिपके यांनी येथे व्यक्त केले. छत्रपती संभाजीनगर शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या आंदोलनात ते बोलत होते. या वेळी आमदार रोहीत पवार यांची उपस्थिती होती.

आम्हाला आंतकवादी म्हणण्यापूर्वी आत्महत्या करणाऱ्या २० जणांच्या मृत्यूस तुम्ही जबाबदार आहात, अर्थाने तुम्हाला ही उपमा लागू पडते, असा घणाघात दिपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर केला. ‘ नीट’च्या पेपरफुटीनंतर २० जणांनी देशभर आत्महत्या केल्या. यास केंद्र सरकारच जबाबदार आहे. असे असताना शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आम्हाला आंतकवादी म्हणत आहे. देशातील शिक्षण व्यवस्थाच सडली आहे. हा केवळ एका ‘नीट’च्या विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही. यामुळे सरकारला हा प्रश्न कळावा म्हणून मराठवाड्यातून जंतरमंतरवर यावे असे आवाहन अभिजीत दिपके यांनी केले. कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रमुखाचे भाषण सुरू असताना तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षा ऑनलाईन न घेता ऑफलाईन घ्याव्यात अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी या वेळी केली. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर निर्माण झालेला रोष एकत्रित करण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजी नगर शहरात आंदोलन करण्यात आले.

‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या आंदोलनातून व्यक्त करण्यात आला. अभिजीत दिपके यांनी भाषणापूर्वी ‘ जय भीम ’ चा नारा भाषणापूर्वी बुलंद केला. या आंदोलनात आमदार रोहित पवार यांनी विविध परीक्षांमधील घोटाळ्यांवर बोट ठेवले.

शेतकरी कर्जमाफीच्या विरोधातील आंदोलन केल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी शिक्षक पात्रता पेपर फुटीच्या विरोधात ही आंदोलन करू असे जाहीर केले होते. सोमवारी दुपारी झालेल्या आंदोलनात रिमझिम पाऊस असला तरी मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षांना बसणारा विद्यार्थी वर्ग सहभागी झाला होता. या आंदोलनानंतर आपण पुन्हा दिल्लीला जाणार असून मराठवाड्यातूनही जंतरमंतरच्या आंदोलनास प्रतिसाद वाढवावा असे आवाहन त्यांनी केले. शिक्षण व्यवस्थे त मोठे बदल करण्याची गरज आहे. ते केले जात नाहीत म्हणून आंदोलन करण्याची गरज असल्याचे दिपके म्हणाले.