छत्रपती संभाजीनगर – नव्याने बांधण्यात येणाऱ्या बांधकामाचा छत कोसळलेल्या ठिकाणचे बचावकार्य १५ तासांपासून सुरू असून, या घटनेत एक कामगार दबल्याचे समोर आले आहे. खंडू विटनुरी, असे त्या कामगाराचे नाव असल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख अशोक खांडेकर यांनी दिली.

दरम्यान, घटनास्थळी कामगाराच्या कुटुंबीय, नातेवाईकांनी धाव घेऊन आक्रोश व्यक्त केला. घटनास्थळी महापौर समीर राजूरकर, महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांच्यासह प्रमुख अधिकारी व पथक दाखल झाले असून, त्यांच्याकडे दबलेल्या कामगाराच्या नातेवाईकांनी मदतीची मागणी आक्रमकपणे लावून धरल्याने वातावरण तणावपूर्ण निर्माण झाले आहे. गर्दीमुळे चिकलठाणा परिसरातील जालना रोडवरील वाहतूकही प्रभावित झाली आहे. नातेवाईकाची समजूत घालण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

जालनारोडवरील द्वारकादास श्यामकुमार कपड्याच्या दालना शेजारी सुरू असलेल्या नव्या बांधकामाचा गुरुवारीच टाकण्यात आलेला छत सायंकाळी ६ च्या सुमारास कोसळला. यामध्ये सुरुवातीला पाच ते सहा कामगार दबले असण्याची भीती व्यक्त केली गेली होती. मात्र छत कोसळण्याचा अंदाज येताच अनेक कामगारांनी तेथून बाहेर धाव घेतल्याने ते बचावले. अशपाक शेख व अंकुश कांबळे हे दोन कामगार जखमी झाले. तर खंडू विटनरी हा कामगार दबला गेल्याचे अग्निशमन विभागाचे प्रमुख अशोक खांडेकर यांनी “लोकसत्ताशी” बोलताना सांगितले.

रात्री पावणे आठच्या सुमारास घटनास्थळी जेसीबी, क्रेन आदी यंत्रणा पाचारण करून मलबा काढण्याच्या कामास सुरुवात झाली होती. रात्रभर छताचा मलबा काढण्याचे काम सुरू होते. रात्रीची वेळ असल्याने क्रेन, जेसीबी व अग्निशमन विभागाच्या वाहनांच्या लाईटच्या लाईटमध्ये मलबा काढण्याचे काम सुरू होते.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार नव्याने सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी गुरुवारी छत टाकण्याचे काम सुरू होते. उभे केलेले छताचे लोखंडी पाईप वाकल्याने काही भाग कलला. त्यानंतर संपूर्ण इमारतीचाच छत पत्त्यासारखा कोसळला. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आल्यानंतर एक बंब व अधिकारी, जवान रवाना झाले.

घटनास्थळी गर्दी

छत कोसळल्याची माहिती कळतात घटनास्थळी रात्री आणि सकाळीही शेकडो लोकांनी धाव घेतली. येथे झालेले गर्दी पाहून घटनास्थळावरील सुरक्षारक्षकांनी पुष्कळ लावण्याचा प्रयत्न केला. जालना रोडवरच घटना घडलेली असल्याने आणि गर्दीमुळे येथे वाहतूकही मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेली आहे.

महापौर, विरोधी पक्षनेते दाखल

छत कोसळल्याच्या घटनास्थळाला रात्री व सकाळी स्थानिक राजकीय नेत्यांनीही भेट देऊन पाहणी केली. यामध्ये महापौर, एमआयएमचे विरोधी पक्षनेत्यांचा समावेश आहे.