छत्रपती संभाजीनगर: जनगणनेच्या कामावरून घरी परतलेल्या शिक्षकाने पाणी पिले आणि नंतर ते पुन्हा उठलेच नाही. दिवसभर उन्हात फिरल्याने त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा आरोप करून वारसांना मदतीच्या मागणीसाठी शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रविवारी सकाळी ९ पासून एकत्र आले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या उपायुक्त अपर्णा थिटे, जनगणना कामाचे चार्ज अधिकारी राजपूत मॅडम यांनी घाटी गाठत शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी काही पदाधिकाऱ्यांना मदतीचे लेखी स्वरूपात आश्वासन देण्याची मागणी लावून धरली. मात्र लेखी आश्वासन मिळत नसल्याने शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आक्रमक झाले असून, त्यांनी शिक्षक किशोर गायसमुद्रे (वय ४५), यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. उद्या विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांचे भेट घेऊन कामबंद आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे.
मृत शिक्षक किशोर गायसमुद्रे हे छत्रपती संभाजीनगर येथील पीरबाजार परिसरातील भागिरथी प्राथमिक विद्यालयात कार्यरत होते, अशी माहिती मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव भाई चंद्रकांत चव्हाण यांनी दिली.

किशोर गायसमुद्रे हे शनिवारी सकाळी सातारा परिसरातील वॉर्ड क्रमांक १० मध्ये जनगणनेच्या कामासाठी म्हणून भावसिंगपुरा भागातील भीमनगर येथील घरातून बाहेर पडले होते. सायंकाळच्या सुमारास ते घरी परतले. तहानलेले असल्याने त्यांनी थंड पाणी पिले. मात्र त्यानंतर ते जागचे उठलेच नाहीत. त्यांना कुटुंबीयांनी तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, किशोर गायसमुद्रे यांना कवच म्हणून कुटुंबीयांना मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.

मृत शिक्षक किशोर यांच्या पत्नीही शिक्षिका असून, मुलगा नुकताच बारावी उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे त्यालाही वय आदी नियमान्वये नोकरीची व्यवस्था करून मदत मिळावी, तसे लेखी स्वरुपात आश्वासन द्यावे, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मनपाच्या उपायुक्त अपर्णा थिटे व चार्ज अधिकारी राजपूत यांच्यासमोर करताना मागणी मान्य झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिक्षक गायसमुद्रे कार्यरत होते ती शाळा एका दिवंगत माजीमंत्र्यांची असल्याची माहिती शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

…. तर कामबंद आंदोलन

मृत शिक्षक किशोर गायसमुद्रे यांच्या वारसांना मदत मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी मराठवाडा शिक्षक संघ, शिक्षक परिषद, राष्ट्रवादी व शिवसेना (उबाठा) पक्षाच्या शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, बामुक्टोचे डॉ. उमाकांत राठोड व अन्य शिक्षक आदी एकत्र आलो आहोत. लेखी आश्वासनाशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाहीत. उद्यापासून कामबंद आंदोलन पुकारू .

  • भाई चंद्रकांत चव्हाण, जिल्हा सचिव, मराठवाडा शिक्षक संघ

किशोर गायसमुद्रे हे आपल्या शाळेतील शिक्षक होते. त्यांच्या कुटुंबीयांना कवच मिळाले पाहिजे. अन्यथा कुटुंबीय उघड्यावर येईल. मास्तर रस्त्यावर मृत्यू पावत असतील तर कुटुंबीयांनी काय करावे ?

  • विलास पाटील, मुख्याध्यापक, भागिरथी प्राथमिक विद्यालय.