छत्रपती संभाजीनगर – राज्य परिवहन महामंडळाची बस व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मृत तरुण पोलिसांची मुले असल्याची माहिती आहे. कन्नड-चाळीसगाव मार्गावरील दूध डेअरीजवळ रविवारी दुपारी ही घटना घडली.

आदित्य शेखर राहिंज (वय १७) व ओम श्रावण तायडे (२३) अशी मृतांची नावे आहेत. मृत दोघे दुचाकीवरून अंधानेरकडे जात होते. तर समोरून कन्नडकडे येणारी कन्नड आगाराची वडनेर कन्नड बसची आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यावेळी सहाय्यक फौजदार जयंत सोनवणे व पोलीस हवालदार दिनेश खेडकर यांनी नागरिकांच्या मदतीने बस खालून गंभीर जखमींना बाहेर काढले. आदित्य राहिंज हा जागीच ठार झाला होता. तर गंभीर जखमी अवस्थेतील ओम तायडे याचा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येत असताना वाटेतच मृत्यू झाला.

हेही वाचा – पंजाबातील तिहेरी हत्याकांडातील सहा आरोपी ताब्यात

हेही वाचा – इम्तियाज जलील कोणत्या मतदारसंघातून लढणार याची उत्सुकता कायम, संभाजीनगर पूर्व की मध्यचा पर्याय निवडणार ?

दोन पोलीस पुत्रांचा अपघात झाल्याचे कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकूरवार, माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे, शहर पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर ,सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी, ग्रामीण सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार तसेच पोलीस कॉलनीतील महिला, मुलांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.