छत्रपती संभाजीनगर : पाणी पुरवठा योजनेतील प्रगतीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून उपअभियंता पूजा जाधव यांना निलंबित करण्यात आल्यानंतर २७५० कोटी रुपयांच्या योजनेतील निष्कृष्ट कामांची यादीच पुढे आली आहे. यामध्ये जायकवाडी ते नक्षत्रवाडी या दरम्यान होणाऱ्या पाणी उपसण्यासाठी सुरू असणाऱ्या पंपगृहाच्या गळतीकडे लक्ष वेधण्यात आले आहे. पंपगृहात पहिल्याच पावसात गळती सुरू झाली. परिणामी विद्युत उपकरणे पाण्यात भिजली. सुरक्षिततेच्या कारणामुळे ती उपकरणे बंद करावी लागली. आजही ही गळती कायमस्वरुपी बंद केली नाहीत, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी वरिष्ठ पातळीवर कळविले आहे.

केवळ एवढेच नाही तर उद्भव विहिरीतील गाळ काढण्यास कंत्राटदाराने पाच महिने उशीर केला. जॅकवेलपर्यंत जाण्याचा पूल तर अजूनही नादुरुस्त आहे. अनेक वॉल्व्हमध्ये गळती कायम आहे. त्याच्या चेंबरची कामे पूर्ण झाली नाहीत. फिल्टर हाऊससारख्या अत्यंत संवेदनशील घटकावर निवाराही उभारण्यात आला नाही. शहरात १२०० किलोमीटरच्या वितरण वाहिन्या टाकल्या असल्या तरी त्याची जलदाब चाचणी पूर्ण झालेली नाही. तसेच शुद्ध पाण्याची गुरुत्त्वीय वाहिनीचीही दलदाब चाचणी पूर्ण झालेली नाही.

जलकुंभाचे गैरव्यवस्थापन

शहरातील ५५ जलकुंभापैकी जुन्या योजनेतून केवळ सहा जलकुंभातूनच पाणी पुरवठा सुरू आहे. नव्या योजनेचा लाभ नागरिकांना मिळू शकला नाही. दिल्ली गेट आणि जुबली पार्क भागातील जलकुंभाची गळती रोखण्यास कंत्राटदारास पूर्ण वर्ष लागले. हे काम आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंत्राटदाराकडून अपेक्षित नाही, असेही अभियंत्यांनी पत्रात म्हटले आहे. शहरातील २५ जलकुंभाना जोडण्यासाठी आवश्यक १० ते १२ मीटरचे काम कंत्राटदाराने पूर्ण न केल्याने पाणी पुरवठा सुरू करता आला नाही. कंत्राटदाराने काम वेळेत काम केले नाही तरी त्याला कोणी विचारत नाही आणि अधिकाऱ्यांचे निलंबन केले जात असल्याने या सर्व कामातून आमची मुक्तता करावी अशी मागणी अधिकाऱ्यांनी केली आहे. उद्भव विहिरीतील गाळ काढण्यासाठी शहरातील सर्व कामे बंद करुन सर्व मजुरांना गाळ काढण्याकरता जुंपले होते, असाही आरोप अभियंत्यांनी केला आहे. अभियंत्याच्या या पत्रामुळे कंत्राटदारावर मेहरबानी कोणाची असा प्रश्न विचारला जात आहे.