छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपअभियंता पूजा जाधव यांच्या निलंबनामुळे पाणी पुरवठा योजनेत कंत्राटदारास मोकळीक आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई असे चित्र निर्माण झाले आहे. या कारवाईच्या विरोधात अभियंत्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाचे सदस्य अमगोथ श्री रंगा नायक यांनी पत्र लिहून खेद व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या पत्रात कंत्राटदारास वरिष्ठ अधिकारी कसे पाठिशी घालत आहेत, याचाही पाढा वाचण्यात आला आहे. यामुळे शहर पाणी पुरवठा योजनेतील अनेक गैरव्यवहार नव्याने चव्हाट्यावर आले आहेत. या पत्रात मुख्य अभियंता मनिषा पालंडे यांच्यासह सात अभियंत्यानी आमची पाणी पुरवठ्याच्या कामातून मुक्तता करावी, असे पत्र लिहिले आहे.
शहर पाणी पुरवठ्याची आढावा बैठक मुख्यमंत्री वॉर रुममध्ये ४ जून २०२६ रोजी घेण्यात आली होती. या बैठकीत ३० जून पर्यंत २८० दशलक्ष लिटर पाणी शहरात पोहचविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. तर या महिन्यात त्यात १०० दशलक्षलिटरची भर टाकावी असे ठरिवण्यात आले होते. एकूण ३८० दशलक्षलिटर पाणी पाणी वाढले तर शहरातील पाणी पुरवठ्यातील आठ ते दिवसाचा खंड कमी करता आला असता. मात्र, ही कामे पूर्ण न झाल्याचा ठपका ठेवून उपअभियंता पूजा जाधव यांना निलंबित करण्याचे आदेश रंगा नायक यांनी बजावले. मुख्यमंत्री वॉर रुममधील आढाव्यात कामे पुढे सरकली नाहीत, असे सांगितल्यानंतर करण्यात आलेली ही कारवाई अन्यायकारक असल्याचे पत्रच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी सनदी अधिकाऱ्यांना पाठविले आहे.
अधिकाऱ्यांच्या पत्रात कंत्राटदारवर मेहरनजर असल्याचा आरोप
शहराच्या पाणीपुरवठ्याचे योजनेच्या कामाचे कार्यरंभ आदेश २०२१ मध्ये देण्यात आले. आता या योजनेचे काम सुरू होऊन पाच वर्ष पूर्ण होत आली आहेत. पण कंत्राटदाराने कधीच वेळेवर आणि अटी शर्थीनुसार काम केले नाही. त्याच्यावर दंडात्मक कारवाईचे प्रस्ताव वारंवार वरिष्ठांना सादर करण्यात आले. पण कंत्राटदारावर काही एक कारवाई झाली नाही. परिणामी कंत्राटदाराचा निष्काळजीपणा आणि मुजोरी वाढली असे अभियंत्यांनी म्हटले आहे. २०० दशलक्ष लिटर पाणी शहरात यावे म्हणून सुक्ष्म नियोजन करुन दिल्यानंतरही कंत्राटदाराने कारवाई केली नाही. या पूर्वी अभियंत्यांनी केलेल्या कामामुळे सायफन प्रणालीने १६ जून रोजी ४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध झाले. मात्र, नाठाळ ठेकदाराकडून काम करुन घेताना चांगले काम करुनही अभियंत्यांस निलंबित करण्याचा प्रकार मानसिक खच्चीकरण करणारा आहे, असे अभियंत्यांनी म्हटले आहे. या पत्रावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे देवेंद्र कोराटे, तुषार टेकवडे, मृणाल धगधगे, ऋषीकेश राऊत, रामभिलवडे, जणेश मोरे यांची स्वाक्षरी आहे.
लाडक्या कंत्राटदारवर मेहरबानी कोणाची ?
२७५० कोटी रुपयांच्या योजनेची अंमलबजाणी करणाऱ्या लाडक्या कंत्राटदारावर मेहरबानी कोणाची असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. गेल्या पाच वर्षापासून रडत – खडत सुरू असणाऱ्या पाणी पुरवठा योजनेची अनेक कामे निष्कृष्ट झाली असल्याचा आरोप अभियंत्यानी या पत्रातून केल्याने कंत्राटदारावर मेहरबान कोण असा प्रश्न विचारला जात आहे.
