Chhatrapati Sambhajinagar Election Result: दोन शिवसेना नेत्यांमधील सततचे वाद, घाेषणा हिंदूत्वाच्या आणि मुस्लिम धार्जीणे अशी ठाकरे गटाची प्रतिमा बनविण्यात भाजपला आलेले यश, महापालिकेत सत्ता असताना केलेला अनागोंदी कारभार, विरोधी पक्षातून सत्तेत जाण्यासाठी मारल्या जाणाऱ्या माकडउड्या यासह एका आक्रमक संघटनेचा बाईट विरुद्ध बाईट असा होत जाणारा मवाळपणा अशी ठाकरे यांच्या शिवसेनेची घसगुंडीची कारणे. शिंदे यांची सेना घटली ती बदनाम नेत्यामुळे. संपत्ती खरेदी करताना नियमांना धाब्यावर बसविण्याचे नेत्यांनी हस्तगत केलेले कौशल्य शहरी भागातील जनता पाहत होती. या सेनेतील मतभेदही तेवढेच तीव्र., परिणामी महापालिका निवडणुकीमध्ये मतदारांनी शिवसेनेला वजा केले.
शिवसेनेत फूट पडली. सत्तेच्या बाजूला बहुतांश नेते गेले. पुढे मंत्री भुमरे धनुष्यबाणावर खासदार झाले. एव्हाना ते उद्धव ठाकरे यांच्या चुका सांगू लागले होते. पैठण मतदारसंघात वर्चस्व असल्याने त्यांचा मुलगा आमदार झाला. पण संपर्क तसा ग्रामीण भागाशी. शहराची जबाबदारी मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे दिलेली. पण त्याचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्याशी वाद असल्याचे स्पष्ट झाले. संघटनेऐवजी ते फक्त आपल्या मुलांच्या राजकीय भवितव्यासाठी सारी ताकद पणाला लावत आहेत, अशी चर्चा सुरू झाली.
याच काळात जंजाळ हे भाजपमध्ये जातील अशीही चर्चा सुरू झाली. पण जंजाळ आणि मंत्री शिरसाट यांच्यातील वाद कमी करण्यासाठी खासदार भुमरे यांनी प्रयत्न केले. अगदी जंजाळ यांचा महापालिकेतील उमेदवारी अर्ज दाखल करतानाही ते त्यांच्याबरोबर आले. पुढे उमेदवार जाहीर झाले आणि जंजाळ वगळता त्यांचे सर्व समर्थक पराभूत झाले. या पराभवात अंतर्गत धुसफूस हेच कारण असल्याची चर्चा आता रंगली आहे. मंत्री शिरसाट यांनी फक्त इटखेडा आणि बन्सीलालनगर या दोन भागातच त्यांच्या मुलासाठी आणि मुलीसाठी प्रचार केला. अन्यत्र त्यांनी फारसा वेळ दिला नाही, असेही आवर्जून सांगितले जात आहेत.
शिवसेनेतील अंतर्गत कुरबुरीचा भाजपला किमान १३ जागांवर लाभ मिळाला. त्याचे अपश्रेय शिरसाट यांना दिले जात आहे. तत्पूर्वी ‘धनुष्यबाणा’ची शिवसेना पुरती बदनाम झाली होती. हॉटेल ‘ विट्स’ प्रकरणी निविदांमध्ये घोळ घातल्याच्या आरोपावरुन मंत्री शिरसाट यांनी मुलगा सिद्धांत यास या व्यवहारातून माघार घ्यायला लावली. पुढे एमआयडीसीमधील मद्यार्क कंपनीसाठी कसा भूखंड मिळवला हे प्रकरण उजेडात आले. वर्ग दोन च्या जमिनी शिरसाट कुटुंबीय नियमबाह्य पद्धतीने घेत आहे, असे आरोप झाले. त्यांची कागदपत्रे माध्यमांपर्यंत पोहचली.
परिणामी शिवसेना हा पक्ष फक्त नियमबाह्य कामे करतो अशीच प्रतिमा निर्माण झाली. या सर्वांचा शहरी मतदारांवर परिणाम झाल्याने साहजिकच तो भाजपच्या बाजूने झुकला. राजकीय लढ्यात सत्तेचा वापर गैर नसतोच , असा काॅग्रेसचा जुना नियम भाजपाने पूर्णत: स्वीकारलेला. त्यामुळे मतदार आपल्या बाजूचे खेचण्यासाठी आवश्यक ते ‘सारे’ करण्यात आले आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये कमळ फुलले. शहरात एक मंत्री, आमदार, खासदार, मुस्लिम मतांवर प्रभाव टाकू शकणारा अब्दुल सत्तार यांच्यासारखा नेता असतानाही शिवसेनेला केवळ १४ जागांवर समाधान मानावे लागले.
जी कारणे धनुष्यबाणाच्या शिवसेनेची घसरणीची तीच कारणे ठाकरे यांच्याही शिवसेनेस लागू. त्यात जाहीर वादाचा भर. उद्धव ठाकरे यांचे दोन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांचे परस्परात अजिबात पटत नाही, हे शहरातील लहान मुलासही माहीत झालेली गोष्ट. मात्र, राजकीय निर्णय घेतानाही हे नेते आपसात बोलत नाही, हे रशीद मामू यांच्या पक्ष प्रवेशामुळे पुढे आले. अंबादास दानवे यांनी तो निर्णय रेटून नेला आणि खैरे यांचा तिळपापड झाला. ते माध्यमांमध्येही ऐन निवडणुकीमध्ये उलट सुलट प्रति्क्रिया देत सुटले. सत्ताशरण होणाऱ्या शिवसैनिकांना आपली सत्ता किमान महापालिकेमध्ये येऊ शकते, हा विश्वास देण्यात शिवसेनेचे सारे नेते अपयशी ठरले.
परिणामी शिवसेनेच्या ठाकरे गटातील गळती काही थांबली नाही. ‘ गद्दार – खु्द्दार’ या प्रचारातून त्यांना बाहेर पडता आले नाही. तत्पूर्वी शहरातील पाणी समस्येला शिवसेनाच जबाबदार आहे, असे चित्र निर्माण करुन त्याचे खापर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर फोडून झाले होते. शहराचा कारभार शिवसेनेच्या दोन्ही गटाला करता येत नाही, अशी भावना भाजपच्या ‘कट्टर’ मतदारांमध्ये पूर्वीपासून होतीच. तिला खतपाणी घालण्यात आले. दोन्ही शिवसेना बदनाम झाल्याने कमळ फुलण्याची शक्यता होती. त्यात धनुष्यबाणाची युती तोडण्यात आली आणि भाजप आता बहुमतापासून फक्त एका संख्येने कमी आहे. ठाकरेंच्या सेनेला केवळ सहा जागांवर समाधान मानवे लागले.
