छत्रपती संभाजीनगर : साखर कारखान्याच्या वजन काट्यावर गाळपासाठी आलेला ऊस कमी दाखवून साखर कारखानदार लूट करत असल्याचा आरोप मराठवाड्यातील लातूर, धाराशिव व नगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमधून होऊ लागला आहे.
राज्यात १८० हून अधिक साखर कारखान्यांपैकी केवळ ५० कारखान्यांनी डिजिटल वजनमापे करून घेतले. विशेषत: खासगी कारखान्यात अशी व्यवस्था बसवली गेली नाही. परिणामी लातूर जिल्ह्यातील ‘मांजरा’ परिवारातील कारखान्यात अशा प्रकारची अनागोंदी केली जात असल्याचा आराेप भाजपचे आमदार रमेश कराड यांनी केला आहे. तर हे आरोप सत्ताधाऱ्यांकडून फेटाळले जात आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकरी संघटनांनी वजनकाट्यांमध्ये अनेक प्रकारच्या अनागोंदी जाणीवपूर्वक केल्या गेल्या असे सांगितले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हा प्रचाराचा मुद्दा बनवला जात आहे. लातूर, धाराशिव, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ५० हून अधिक कारखान्यांमध्ये असे घोळ असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. साखर आयुक्तालयाने वजन मापे यंत्रणेने अस्तित्वात असणारे वजन मापे खरोखर ‘डिजिटल’ आहेत का, हेही तपासावे, अशा सूचना केल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८ कारखान्यांच्या ३४ वजन काट्यांची तपासणी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र लातूर, धाराशिव, सोलापूर आणि बीड जिल्ह्यातून मापात पाप केले जात असल्याच्या तक्रारी शेतकरी करत होते. आता हा मुद्दा जिल्हा परिषद निडणुकीमध्ये चर्चेत आला आहे. दरम्यान, कॉंग्रेसकडून वजन काट्यात दोष ठेवून लूट केली जात असल्याचे मुद्दे खोडून काढण्यात आले आहेत. जर असे असते तर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असता. गेली अनेक वर्षे मांजरा परिवरातील कारखान्यांना उत्कृष्ट व्यवस्थापनाचे पुरस्कार मिळाले आहेत. शेतकऱ्यांना अहित दिसले असते तर त्याविरोधात आवाज उठवला गेला असता. केवळ निवडणुकीत मुद्दा हवा म्हणून असा प्रचार केला जात आहे.

