विहिरीत उतरलेली मुले दोर तुटून जखमी; दोन गंभीर

५० फूट खोल विहिरीत दोर सोडून लहान मुलांना उतरवले जाते. ते पाणी भरून देतात.

चाकूर तालुक्यातील जानवळ येथील लहानग्यांना पाण्यासाठी अशी विहिरीत उतरण्याची कसरत रोजच करावी लागते.

पाणीटंचाईची भीषणता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जीव मुठीत धरणे या म्हणीचा अर्थ जसाच्या तसा अनुभवायला मिळावा, अशी अवस्था चाकूर तालुक्यातील जानवळ वस्तीवरील गावकऱ्यांना येत आहे. ५० फूट खोल विहिरीत दोर सोडून लहान मुलांना उतरवले जाते. ते पाणी भरून देतात. घागरीला दोन्ही बाजूने दोर बांधून घागर ओढली जाते. ही कसरत दररोज करणाऱ्या जानवळ वस्तीवरील पाच मुले दोर तुटल्यामुळे सोमवारी दुपारी विहिरीत पडली. यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. चाकूर तालुक्यातील १० हजार वस्तीच्या जानवळमधील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी येथील एका विहिरीवरच अवलंबून राहावे लागते. शिवनखेडी व दाबकीहाळ या दोन गावांवरून पूर्वी पाणी आणले जाई. शेजारच्या तांडय़ावरही साठवण तलाव होता, मात्र सर्व स्रोत आटले. परिणामी, गावातच असणाऱ्या खासगी विहिरीतून पाणी भरण्याशिवाय पर्याय नाही. या विहिरीचा व्यास मोठा आहे. त्याला सिमेंटचे कडे आहेत. पाण्याने तळ गाठला असल्याने ५० फूट खोल दोर सोडून विहिरीत लहान मुलांना उतरवले जाते. ते पाणी भरून दिल्यानंतर घागरीला दोन्ही बाजूने दोर बांधून घागर वर ओढावी लागते. ही कसरत करत असताना सोमवारी दुपारी दोर तुटल्यामुळे पाच मुले विहिरीत कोसळली. यात प्रदीप मनोहर कांबळे व बंटी कांबळे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.  या विहिरीत सुरुवातीला मऊ खडक, त्यानंतर कठीण खडक व नंतर पाषाण अशी  रचना आहे. मुले मऊ खडकावर आपटली, त्यामुळेच त्यांचा जीव वाचला.  त्यानंतर गावातील काही तरुणांनी विहिरीत उतरून जखमींना बाहेर काढले.

ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष

गावकऱ्यांनी गावात पाण्याचा तुटवडा असल्यामुळे टँकरची मागणी केली खरी, मात्र प्रशासनाने याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही.

 

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व औरंगाबाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Children injured due to fall in well