छत्रपती संभाजीनगर: शहरातील केंब्रिज शाळा ते एपीआय कॉर्नर, महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडी आणि रेल्वे स्टेशन उड्डाणपूल दरम्यान ६० मीटर रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यानंतर पडेगाव ते मिटमिटा भागातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. पाडापाडीच्या धास्तीने पडेगावातील सहा किमीपर्यंत अंतरातील ६० मीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेली अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे नागरिक स्वत:हून काढत असल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, गुरुवारी (दि. ३) सकाळी आठ वाजता पडेगाव येथे महापालिकेच्या अनधिकृत बांधकामे काढण्यास सुरुवात होईल, असे अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले.
मनपाकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे मनपाने एपीआय कॉर्नर ते केंब्रिज शाळा, महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडी आणि रेल्वे स्टेशन उड्डाणपूल या ६० मीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेली अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली. त्यानंतर पडेगाव ते मिटमिट्यापर्यंत ही कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी यापूर्वीच आरेखन करण्यात आले असले, तरी मनपाच्या पथकाकडून कारवाई केली जाणार असल्याचे ध्वनिक्षेपकावरून सांगण्यात येत आहे. पडेगावात कारवाईच्या धास्तीने रहिवाशांनी स्वत: अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे काढून घेतली आहेत. सहा किमी अंतरावर सुमारे एक हजार मालमत्ता असल्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपासून व्यवसाय बंद
पडेगावात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गॅरेज, हॉटेल, ज्यूस सेंटर, वॉशिंग सेंटर, बांधकाम साहित्य विक्रीची दुकाने, पेट्रोलपंप, धाबे, जुने वाहन विक्री सेंटर, नर्सरी अशी सुमारे एक हजार दुकाने आहेत. या दुकानदारांनी अनधिकृत बांधकामे काढून घेण्यासाठी दोन दिवसांपासून व्यवसाय बंद ठेवला आहे.