scorecardresearch

हवामान बदलाचा फळपिकांना फटका, दर गडगडले

वाढते ऊन आणि असनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या हवामान बदलाचा फटका फळपिकांना बसत आहे.

औरंगाबाद : वाढते ऊन आणि असनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या हवामान बदलाचा फटका फळपिकांना बसत आहे. दमट वातावरणामुळे अंजिरासारखे फळ कमी कालावधीत पिकत असून बाजारपेठेत दर अत्यंत गडगडले आहेत. अंजिराला ठोक बाजारपेठेत २० ते ३० रुपये किलो तर किरकोळ विक्रीतून ४० ते ५० रुपये एवढा कमी दर मिळत आहे.

औरंगाबादच्या जाधववाडी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी अंजिराची सहा क्विंटल आवक झालेली होती. दर किमान बावीसशे रुपये तर कमाल चौतीसशे रुपये क्विंटलने मिळाला. सर्वसाधारण दर २८०० रुपये होता. मात्र, जाधववाडीत येणारा अंजिराचा मालही काहीसा हलक्या प्रतीचा असल्यामुळे त्याला कमी दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. साधारणपणे गावरान किंवा दिनकर, असे अंजिरांमध्ये दोन प्रकार आहेत. दिनकर अंजिर आकाराने मोठे असले तरी त्याला कमी भाव मिळतो. तर गावरान अंजिर आकाराने लहान असून त्यातील गोडवा पाहून चांगला म्हणजे शेतकऱ्यांना जागीच ४० ते ५० रुपये किलोचा दर मिळतो. मात्र, सध्या वातावरण दमट आहे. उन्हाचा वाढता पारा आणि असानीसारख्या चक्रीवादळासारख्या हवामान बदलाच्या परिस्थितीने दर गडगडले आहेत. अशा दोन टोकाच्या हवामानाची एकाचवेळी परिस्थिती उद्भवल्यामुळे पंधरा दिवसात पिकणारे अंजिराचे फळ आठच दिवसात काढणीला येते. दिवसभरात एखादा क्विंटल निघणारा माल दीड क्विंटलपर्यंत काढावा लागत आहे. काढलेला माल बाजारपेठेत न्यावाच लागतो आणि नैसर्गिकरीत्या न पिकलेल्या मालाला बाजारात भावही पाडून मागितले जातात. अंजिराला ढगाळ वातावरण अनुकूल नसून त्यामुळे फळगळती किंवा पिकण्याची प्रक्रिया नैसर्गिक वेळेपूर्वीच घडते, असे दौलताबाद परिसरातील उत्पादक नसीब खान यांनी सांगितले.

दौलताबाद परिसरात शंभर एकरवर अंजिराचे लागवड क्षेत्र आहे. सध्या दरामध्ये मंदी आलेली आहे. मालाचा दर्जा पाहून व्यापारी दर ठरवतात. असानी चक्रीवादळासारख्या परिस्थिमुळे निर्माण झालेले ढगाळ वातावरण आणि उन्हाचेही तापमान ४३ अंशांपर्यंत पोहोचलेले असून त्याचा परिणाम अंजिरासारख्या फळपिकांवर होताना दिसतो आहे. अंजिराला ढगाळ वातावरण चालत नाही. अशा वातावरणामुळे फळ पिकण्याची प्रक्रिया नैसर्गिक कालावधीपेक्षा कमी वेळात होते. परिणामी दर्जात घसरण होऊन दर कोसळतात. 

– नसीब खान, उत्पादक शेतकरी

वातावरणाच्या परिणामातून मोसंबी, आंब्यांची फळगळती होते. आंब्यांवरती डाग पडतात. ढगाळ वातावरणामुळे बुरशीचे प्रमाण वाढते. डाळिंबावरही बुरशीचा हल्ला होतो. विशेष म्हणजे ढगाळ वातावरण आणि थोडेसे थेंब जरी आले तरी डाळिंबावर तेल्या रोग पडण्याची शक्यता अधिक बळावते.

-श्याम काळे, फळ उत्पादक

दमट वातावरणात तयार झाले की अंजीर पिकते. पण त्यातला गोडवा नैसर्गिकरीत्या राहात नाही. अंजीर हिवाळय़ातले पीक आहे. उन्हाचाही परिणाम अंजिरावर होतो. फळ डागाळले जाते. 

– अशोक गायकवाड, निवृत्त कृषी अधिकारी.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Climate change hits fruit crops prices plummet wool hurricane background weather change fruit crops ysh

ताज्या बातम्या