छत्रपती संभाजीनगर – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे आपण २० रुपये उधार घेऊन कमल तलावाचे तिकीट काढल्याचे सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथे तीनशे वर्षे पुरातन कमल तलावाचे पुनरुज्जीवन महानगरपालिकेकडून करण्यात आले. या तलावाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रांती चौकातील काला चबुतरा भागात आयोजित ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे अध्वर्यु स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमातच करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कमल तलावाचे पुनरुज्जीवन आज कुठेही होत असेल तर त्याचा सर्वात जास्त आनंद आम्हाला आहे. अलिकडच्या काळात कमळाचेच अधिकतर रोपण होत आहे. कमळाकडेच लोक वळून राहिलेले असून, तीनशे वर्षांपूर्वीही कमळाचे महत्त्व जाणून असणारे होते, हे आज लक्षात येत आहे. त्यांना माहित होते की कमळच चालणार आहे आणि कमळाचेच राज्य येणार आहे. म्हणूनच त्याकाळच्या मंडळींनी कमल तलाव तयार केला. परंतु कालौघात कमल तलाव दुर्लक्षित झाला. परंतु पुन्हा आता तलाव नवीन स्वरूपात पुढे आला असून, पर्यटकांचे आकर्षण म्हणूनही समोर आलेला आहे.

कमळाचे महत्त्व सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कमळाच्या ठिकाणी कितीही चिखल, दलदल असो पण कमल फुल ते कधीही एक छिटाही आपल्या अंगावर येऊ देत नाही. कमळावर कुठलाही दाग लागत नाही. अशा या कमल फुलाच्या तलावाचे येथे पुनरुज्जीवन केलेले असून, त्याचे पहिले तिकीट आपण स्वतः २० रुपये उधार घेऊन खरेदी केले आहे.

हे २० रुपये आपले मंत्रीमंडळातील सहकारी अतुल सावे यांच्याकडून उधार घेतलेले असून, आज आपण कमल तलाव पाहायला जाऊ शकलो नाही तरी आपली मनपा आयुक्तांना विशेष विनंती असेल की, जेव्हा पुन्हा कधी शहरात येऊ त्यावेळी जुने तिकिट अधिकृत समजून आपणास तलाव बघण्यासाठी प्रवेश द्यावा, तिकीट जुने झाले, आता ते चालणार नाही असे म्हणू नका, असेही फडणवीस मिश्किलपणे म्हणाले.

अतुल सावे यांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, अतुलजी आपण तुमच्याकडून २० रुपये उधार घेतले आहेत, पण पुढच्या काळात उधार घेतलेले २० रुपये परत करेन, असा विश्वास सर्वांच्या साक्षीने देतो. तोपर्यंत तिकीट ठेवून देतो, असे सांगत फडणवीस यांनी कमल तलावाचे पुनरुज्जीवन केल्याबद्दल मनपा आयुक्त जी. श्रीकांत व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमास खासदार संदिपान भुमरे, सारंग टाकळकर, डॉ. शिरीष खेडगीकर आदी उपस्थित होते.