छत्रपती संभाजीनगर : जंतर मंतरचे आंदोलन झाले, त्यात काय शिकण्यास मिळाले आणि पुढे काय चांगले करता येईल, यावर चर्चा करण्यासाठी बुधवारी ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे प्रमुख बैठक करणार आहेत. या बैठकीत हे आंदोलन देशभर कसे वाढवता येईल, यावरही चर्चा होणार आहे. पुढील दिशा कशी असेल, यावर दोन दिवस चर्चा होणार असल्याचे पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी सांगितले. कॉक्रोच जनता पार्टी हा निवडणुकीतील पक्ष होणार नाही. सध्या तरी आंदोलनाच्या स्वरुपातच काम करू असे सौरभ दास यांनी सांगितले.
दरम्यान, इथेनॉलमिश्रीत पेट्रोलमुळे जर कोणी आंदोलन केले तर त्याला आमचा पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. जंतरमंतरवरील आंदोलन देशविरोधी, संविधानविरोधी आणि अजारकतेच्या व्याकरणाचा भाग असल्याच्या रा. स्व. संघाचे सहकार्यवाह अतुल लिमये यांच्या वक्तव्याचा समाचार घेत दीपके म्हणाले, ज्यांनी गांधी हत्या केली आणि आंबेडकरांचा आयुष्यभर विरोध केला, त्यांनी आम्हाला लेक्चर देऊ नये. उशिरा का होईना सरसंघचालक बोलताहेत ही चांगली सुरुवात आहे, असेही ते म्हणाले. मात्र, तरुणांनी तरुणांबरोबर बोलले तर चांगले होइल, असे ते म्हणाले.
दीपके यांच्या व्यक्तिगत शैक्षणिक खर्चाबाबत होणाऱ्या तक्रारीवर ते म्हणाले, यावर काय बोलणार, खूप तक्रारी आहेत. पण होणाऱ्या तक्रारी प्रसिद्धीसाठी केल्या जात आहेत. ई-२० वर बरीच मंडळी चर्चा करत आहेत. तो मोठा मुद्दा बनला आहे. मोठ्या उद्योगांसह आम आदमी पक्षाने हा मुद्दा उचललेला आहे. त्याबाबत जी काही आंदोलने होतील, त्याला आमचा पाठिंबा असेल. हा काही एका पक्षाचा मुद्दा राहिलेला नाही. गाडीचे इंजिन खराब होत आहे. सरासरी किती पेट्रोलमध्ये किती गाडी चालते, याचे आकडे बदलत आहेत. जर सरकार १०० टक्के पेट्रोल देत नाही, त्यात इथेनॉल मिसळले जाते, मग पेट्रोलचा दर १०० टक्के कसा लावता, असा प्रश्नही दीपके यांनी उपस्थित केला.नव्याने कोणत्या विषयावरचे आंदोलन उभे केले जाईल का, याविषयी दोन दिवस चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आशितोष रांका, सौरभ दास ही मंडळी बैठकीसाठी पोहचली असून दुपारी १२ नंतर बैठकीस सुरुवात होईल असे सांगण्यात आले.
