छत्रपती संभाजीनगर : फारोळा येथील २६ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्राचे काम अपूर्ण असले तरी मुख्यमंत्र्यांचा आदेश पूर्ण करण्यासाठी शहराला वाढीव पाणी मिळवून दिले जाणार आहे. या कामासाठी २२ जुलै हा मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त ठरविण्यात आला आहे. महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी बुधवारी सकाळी फारोळा येथे जाऊन जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची पाहणी केली. ठेकेदाराला रात्रीचा दिवस करून काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे नवीन पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी नवीन पाणी पुरवठा योजनेतून ३० ऑक्टोबरपर्यंत आणि नऊशे मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून वाढीव पाणी ३० जूनपर्यंत देण्याचे आदेश दिले. परंतु, ३० जून उलटून गेली तरी शहराला नऊशे मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून वाढीव पाणी पुरवठा सुरू झालेला नाही. विभागीय आयुक्तांनी आढावा घेत ३१ जुलैपर्यंत फारोळ्यातील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी सुरू करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसालाच शहरात नवीन उपक्रम, योजना राबविण्याच्या दृष्टीने प्रशासनाला आदेश देण्यात आले. त्यानुसार काल मंगळवारी तातडीने मनपाचे वरिष्ठ अधिकारी फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रावर पोहचले. त्याठिकाणी त्यांनी कामाची पाहणी करून अडचणी जाणून घेतल्या. त्यापाठोपाठ आज बुधवारी सकाळी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत हे देखील फारोळा येथे दाखल झाले. प्रशासकांनी अत्यंत बारकाईने जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. त्याठिकाणी असलेल्या अडचणी तातडीने सोडविण्याचे आदेश दिले. शुद्धीकरण केंद्राचे काम २० दिवसांत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पाणी पुरवठा योजनेचे समन्वयक ए. बी. देशमुख, के. एम. फालक, एम. बी. काझी, कार्यकारी अभियंता किरण धांडे, उपअभियंता एम. एम. बाविस्कर यांच्यासह श्रीहरी असोसिएट्सचे अभियंते उपस्थित होते.