छत्रपती संभाजीनगर – शाळेच्या बांधकामात साहित्य पुरवण्याचे काम केल्याचा मोबदला म्हणून दिलेली रक्कम जिजाऊ मल्टिस्टेटमधील अपहार असल्याचे भासवून आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची धमकी देत एक कोटी लाच देण्याची मागणी बीड पोलीस विभागातील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे याने केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधकाकडून खाडेसह आर्थिक गुन्हे शाखेचा सहायक फौजदार रविभूषन जाधवर व खासगी व्यक्ती कुशाल प्रविण जैन (वय २९), यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणात एक कोटींची लाच मागून ३० लाखावर तडजोड करण्यात आली व त्यातील पाच लाख एका दुकानात स्वीकारताना कुशल जैन याला  ताब्यात घेतले.

हेही वाचा >>> धाराशिव शहरातील अनधिकृत होर्डिंगवर होणार कारवाई

यातील तक्रारदार आणि त्याचा खाजगी चालक यांनी मासाहेब जिजाऊ मल्टी स्टेट बँकेचे संस्थापक संचालक बबन शिंदे यांचे शाळेच्या इमारतीच्या बांधकामाकरीता साहित्य पुरवले होते. मोबदला म्हणून ६० लाख रुपये बबन शिंदे यांनी तक्रारदार व साक्षीदार यांना दिले होते. तथापि बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बबन शिंदे व इतरांवर बॅंक अपहार प्रकरण असुन तपास पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे हे करत आहेत.  यातील तक्रारदार व साक्षीदार यांना बबन शिंदे याने दिलेली ६० लाख रक्कम बॅंक अपहारातील आहे असे भासवून नमुद गुन्ह्यांत तक्रारदार व साक्षीदार यांना आरोपी करण्याचा धाक दाखवून तसेच तक्रारदार व साक्षीदार यांची मालमत्ता जप्त करण्याची भिती दाखवून यातील लोकसेवक जाधवर यांनी तक्रारदार यांचेकडे स्वत:साठी एक लाख रुपये मागणी करुन पोनी खाडे यांना लाच रक्कम मिळुन देण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच पोनी खाडे यांनी तक्रारदार व साक्षीदार यांना प्रत्येकी ५० लाख या प्रमाणे १ कोटी रुपये लाचेची मागणी करुन तडजोड अंती ३० लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले .तसेच तक्रारदार यांचेकडुन पहीला हप्ता म्हणुन ५ लाख रुपये खाजगी व्यक्ती कुशाल जैन मौजकर टेक्सटाईल यांचेकडे देण्यास सांगितले .

हेही वाचा >>> विकास रुळावर कधी येणार?

त्यावरुन बुधवारी सायंकाळी सापळा कारवाई करण्यात आली. कुशाल जैन याने पोनी हरिभाऊ खाडे यांचे सांगण्यावरून तक्रारदार यांचेकडुन पंचा समक्ष ५ लाख रुपये स्वीकारताच त्यास लाच रकमेसह पकडण्यात  आले . पोनी खाडे सहायक फौजदार जाधवर व खाजगी इसम कुशाल जैन यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन बीड शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे . सापळा अधिकारी – शंकर शिंदे पोलीस उपअधिक्षक, सह सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक युनुस शेख, संतोष घोडके पोनी तथा ला.प्र. वि. छत्रपती संभाजीनगर  सापळा पथक:- अविनाश गवळी , भरत गारदे,अमोल खरसाडे,अंबादास पुरी, हनुमान गोरे आदींनी ही कारवाई केली