औरंगाबाद : राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करावा, असा तक्रार अर्ज केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या आत्याने येथील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात मंगळवारी दिला आहे. ५९ वर्षीय आत्या गुंफाबाई गंगाधर भालेराव या मुकुंदवाडीतील मुकुंदनगरमधील रहिवासी आहेत.

गुंफाबाईंनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार त्या व त्यांचा भाचा म्हणजे समीर वानखेडे हे दोघेही नवबौद्ध जातीचे आहेत. तसे  सर्वांकडेच जातीचे प्रमाणपत्र आहे. त्यावरून मंत्री नवाब मलिक हे अर्जदार आणि त्यांच्या भाच्याचा मागासवर्गीय असल्या कारणाने द्वेष करत आहेत. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केल्याच्या घटनेवरून मलिक हे वानखेडे व त्यांच्या सर्व कुटुंबीयांविरुद्ध जातीबद्दलच्या भाषणात, पत्रकार परिषदेत जाहीर वक्तव्य करत आहेत. तसेच मलिक यांनी वानखेडे कुटुंब हे मुस्लिम असून समीर यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचे जाहीर केले आहे. मलिक हे माध्यमांना खोटी माहिती देऊन अधिकाराचा गैरवापर करत आहेत, असा आरोपही तक्रारीतून केला आहे. मलिक यांच्या सततच्या वक्तव्यामुळे आणि खोट्या माहितीमुळे माझी व सर्व कुटुंबीयांची मन:स्थिती बिघडली असून आम्ही मानसिक तणावात आलो असल्याचेही तक्रार अर्जात म्हटले आहे.