बिपीन देशपांडे

औरंगाबाद : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या राष्ट्रव्यापी मोहिमेसाठी देशातील राष्ट्रध्वज निर्मिती करणाऱ्या खादी संस्थांनी ३० कोटी ध्वज अवघ्या पंधरा दिवसांत पुरवठा करण्याच्या केंद्रीय यंत्रणेच्या प्रस्तावाला स्पष्टपणे नकार दिला आहे.

 उपलब्ध मनुष्यबळ आणि यंत्रणा, निर्मिती प्रक्रियेदरम्यान पाळावयाची राष्ट्रध्वजाबाबतची संहिता आणि त्यासाठी हाताने कातलेले आणि विणलेल्या कापडाची उपलब्धता, अशी कामे पंधरा दिवसांच्या कालावधीत उरकणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. प्रस्ताव फार पूर्वी पुढे आला असता तर इतक्या मोठय़ा संख्येच्या राष्ट्रध्वजाची निर्मितीही शक्य होती आणि खादी संस्थांना करोना काळातून सावरण्यास बळही मिळाले असते, असेही केंद्रीय यंत्रणेच्या निर्दशनास आणून देण्यात आले. केंद्रीय खादी आयोगाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत २८ जुलै रोजी मुंबईत एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला देशभरातील दहा-बारा खादी वस्तूंसह राष्ट्रध्वज निर्मिती करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीला नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे सचिव ईश्वरराव भोसीकर हेही उपस्थित होते. बैठकीत खादी संस्थांपुढे ३० कोटी झेंडय़ांचा १३ ऑगस्ट पूर्वीपर्यंत पुरवठा करण्याविषयी विचारणा झाली.  त्यास नकार देण्यात आला. 

‘मखाग्रास’चे सचिव ईश्वरराव भोसीकर यांनी सांगितले, की संस्था दरवर्षी २५ हजार राष्ट्रध्वज निर्माण करते. कारसारख्या वाहनात लावण्यात येणाऱ्या लहान आकारापासून ते सचिवालयाच्या ठिकाणी फडकवण्यात येणाऱ्या १४ बाय २१ आकारातील राष्ट्रध्वजाची निर्मिती संस्थेकडून केली जाते. करोनाकाळातही कामगारवर्गाच्या हाताचे काम थांबलेले नव्हते. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून राष्ट्रध्वजाच्या निर्मितीचा वेग वाढवलाही आहे. गेल्या सहा महिन्यात २५ हजार राष्ट्रध्वजाची निर्मिती केली. आणखी १० हजार ध्वजांची निर्मिती करता येईल, एवढेच संस्थेकडे कापड आहे. ३० कोटींच्या संख्येने राष्ट्रध्वजांची निर्मिती करण्यासाठी खादीच्या कापडाचीही मुबलकता आवश्यक आहे. परंतु खादीतील निर्मितीतील विशिष्ट संस्कारित पद्धत पाहता तेवढे कापड उपलब्ध करणे आणि अवघ्या पंधरा दिवसात राष्ट्रध्वज तयार करून त्याचा पुरवठा आयत्यावेळी शक्य नाही. मराठवाडय़ातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनीही स्वतंत्र बैठक घेऊन खादी संस्थेला राष्ट्रध्वज पुरवठय़ाबाबत विचारणा केली. मात्र, जिल्हास्तरावरही ३ ते ४ लाखांपर्यंतच्या राष्ट्रध्वजाचा पुरवठा खादी संस्थांना शक्य नाही. शिवाय खादीच्या राष्ट्रध्वजाची किंमत साधारण मोठय़ा आकारातल्या झेंडय़ांची किंमत ३०० रुपयांपासून सुरू होते. प्रशासनाला ३० रुपयांत झेंडा मिळावा, असे अपेक्षित दिसते आहे. त्यामुळे आम्ही स्पष्टपणे नकार दिला, असे भोसीकर यांनी सांगितले.

नकाराचे कारण..

राष्ट्रध्वजाची कापड निर्मिती व त्यावर वेगवेगळय़ा टप्प्यांवर होणारे संस्कार, राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा, घटनेने आखून दिलेल्या संहितेनुसार निर्मितीसाठी केल्या जाणाऱ्या ३० कोटी झेंडय़ांच्या प्रस्तावास नकार देण्यात आला आहे.

थोडी माहिती..

मराठवाडा खादी ग्रामोद्योग संस्थेकडून निर्मित राष्ट्रध्वजाला देशातील १६ प्रांतांमधून मागणी असते. या राष्ट्रध्वजाचे कापड हे उदगीर येथे तयार केले जाते, तर त्याची धुलाई ही अहमदाबाद येथे होते. नांदेड येथे राष्ट्रध्वजातील रंगसंस्कार होतात.

खादीसाठी हातानेच कातलेले आणि विणलेले कापड लागते. परंतु ऐनवेळी मिलचे कापड, टेरिकॉट, सिल्कचे कापड वापरण्याचाही विचार बैठकीत मांडण्यात आला होता. परंतु राष्ट्रध्वजाची विशिष्ट संहिता पाहता समोर आलेल्या ३० कोटी झेंडे पुरवण्याचा प्रस्तावास नकार दिला.

– ईश्वरराव भोसीकर, सचिव, मखाग्रास