छत्रपती संभाजीनगर : ‘संघटन सृजन’ असे नाव देऊन राज्यात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष बदण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. २७ एप्रिलपर्यंत कोण जिल्हाध्यक्ष असावा याची माहिती प्रदेश पातळीवर दिली जाईल असे या कामासाठी नियुक्त कॉंग्रेसचे नेते विवेक बन्सल यांनी सांगितले. स्वातंत्र्यापूर्वी १९१९ मध्ये कॉंग्रेसमध्ये जसे मोठे फेरबदल केले होते, त्याच प्रकारचे परिवर्तन या वेळी करण्याचा मानस असल्याचा दावा कॉंग्रेसकडून केला जात आहे. या नव्या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर, नांदेडसह अनेक जिल्ह्यात खांदेपालट होणार आहे.

केवळ अधिकार नाही तर जिल्हाध्यक्ष पद ही जबाबदारी असते. ही जबाबदारी कोणाला पेलता येईल याची पाहणी करण्यासाठी स्वतंत्र निरीक्षक नेमण्यात आले आहे. विवेक बन्सल यांना या कामी सहकार्य करण्यासाठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील काही दिवस बन्सल हे मुक्कामी थांबून शहर व जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. कोणता व्यक्ती योग्य राहील याच्या शिफारशी २७ एप्रिलपर्यंत केल्या जातील असे बन्सल यांनी गुरुवारी एका पत्रकार बैठकीमध्ये सांगितले. एखाद्या काॅग्रेस नेत्यांनी मुक्काम करुन संघटनेतील कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याची ही अलिकडच्या काळातील पहिलीच वेळ मानली जाते. बन्सल हे हरियाणातील कॉंग्रेसचे नेते आहेत.

या प्रक्रियेनंतर संभाजीनगर जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागातील अध्यक्ष आता बदलले जाणार आहेत. ज्या पद्धतीने सर्वसामांन्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे त्यावर बोट ठेवण्याची गरज आहे. पण कॉंग्रेसमधील विविध शाखा नीटपणे काम करत नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळेच काॅग्रेसने ठराव घेऊन पक्षांर्तगत बदल करण्याची मोहीम गांभीर्याने घेतली आहे. केंद्रीय स्तरावरुन पाठवलेल्या नेत्याने बदलामध्ये योग्य व्यक्तीची निवड करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सृजन याचा अर्थच नवनिर्मितीशी जोडलेला आहे. त्यातून पक्षात नवे बदल घडतील, असा दावा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. या पत्रकार बैठकीस प्रवक्ते अतुल लोंढे, किरण पाटील डोणगावकर, युसुफ शेख, प्रकाश मुगदिया, धनंजय चौधरी सिद्धार्थ हत्तीहंबीरे आदीची उपस्थिती होती.